Skip to main content

इट टेक्स करेज टू मेक राईट.. राईट 

अ फ्यु गुड मेन ते शौर्य.. 



इट टेक्स करेज टू मेक राईट.. राईट! अशी टॅगलाईन असणारा शौर्य हा चित्रपट २००८ मध्ये येऊन गेला. हा चित्रपट आताच आठवण्याचे कारण केंद्र सरकारचा कलम ३७० अधिक कमकुवत, जवळ जवळ रद्द करण्याचा धाडसी, महत्वपूर्ण निर्णय  हे आहे. राज्यतघटनेतले ३७० हे कलम आणि त्यानुषंगाने आलेले ३५अ हे कलम यावर प्रचंड चर्चा, विवाद, न्यायालयीन खटले आजवर झाले आहेत. राज्यघटनेतील तरतूद, त्याचे बरेवाईट परिणाम यावर खूप चर्चा झाली आहे. ते कलम जम्मू आणि काश्मीर आणि लडाख पूर्णपणे भारतीय गणराज्यात सामील होण्यातला कसा अडथळा आहे यावर विद्यमान सत्ताधारी पक्ष, त्या पक्षाची मूळ विचारधारा आणि पालक संघटना म्हणजेच संघ ठाम होते आणि आहे. केंद्र सरकारच्या धाडसी निर्णयानंतर देशभर आनंदाचे, कौतुकाचे वातावरण आहे. इथवर सगळं ठीक आहे. पण मग शौर्य हा सिनेमा आणि त्याप्ररकारचे इतर सिनेमे यांचे प्रयोजन काय? १४ जानेवारी १९८९ हा दिवस काश्मीर खोऱ्यातील हिंदू, जे काश्मिरी पंडित या नावाने ओळखले जातात त्यांच्यासाठी काळा दिवस ठरला. खोऱ्यातील मशिदींमधून हिंदूंना काश्मीर त्वरित सोडण्याच्या धमक्या दिल्या गेल्या. काश्मिरी हिंदू  भीतीने घरदार मागे सोडून मिळेल त्या साधनाने खोरे सोडून निघाले. त्या दरम्यान झालेला नरसंहार, स्त्रियांवरील बलात्कार यांची गणती नाही. ती भळभळती जखम घेऊन काश्मिरी पंडित समाज आपल्याच देशात निर्वासित म्हणून गेले ३० वर्षं जगतो आहे. १४ जानेवारी चा तो दिवस ही सुरुवात होती एका काळ्या अध्यायाची. काश्मीरमधल्या वाढत्या धार्मिक हिंसाचाराची, फुटीरतावादाची. तोवर काश्मीर खोऱ्यात लष्कराचा वावर होता पण मर्यादित. हिंदी सिनेमासाठीचे ते आवडते ठिकाण होते. काश्मीर की कली काय किंवा सिलसिला ते अगदी रोजा पर्यंत कित्येक चित्रपटांचे चित्रीकरण काश्मिरात झाले आहे. त्यानंतर चित्रपट आले ते काश्मीरची विदारक स्थिती विशद करणारे. त्यात मिशन काश्मीर, हैदर, सिकंदर पासून नंतर थेट कारगिल युद्धावर आधारित चित्रपट असे दोन्ही बाजू मांडणारे चित्रपट आले. वाढत्या फुटीरतावादाबरोबर, दहशतवादाबरोबर लष्कराचा, अर्धसैनिक दलांचा वावर वाढला. आणि दुर्दैवाने त्यात काही अप्रिय घटना घडल्या. त्या जवळ जवळ नियम सिद्ध करणारा अपवाद अशा प्रकारच्या आणि अशा संख्येने असल्या तरी त्या घडू नयेत हे तितकेच खरे. म्हणूनच शौर्य हा चित्रपट 'इट टेक्स करेज टू मेक राईट.. राईट' अशी टॅगलाईन घेतो. 

काश्मीर मध्ये सीमेपलीकडून घुसखोरी होते. ते घुसखोर स्थानिक गावात, घरात शस्त्राच्या बळावर आश्रय घेतात. हा आश्रय शब्दशः 'सर्व' प्रकारचा असतो. भारतीय लष्कर असे घुसखोरीचे प्रकार शक्य तितके सीमेवरच नेस्तनाबूत करते तरीही काही प्रमाणात ते होतात. आता धर्माची अफू काश्मीरमध्येच इतकी भिनली आहे की सीमेपलीकडून केवळ आदेश आणि शस्त्रे येतात. तर शौर्य सिनेमाची कथा आहे २००७ सालातली. काश्मीरच्या पुंज (चित्रपटात सुरक्षाविषयक काही अडथळे नको म्हणून गावाची नावे अंशतः बदलली आहेत. ) या पुलवाना (पुलवामा) जिल्हातील गावात 'कॉर्डन अँड सर्च' कारवाईदरम्यान कॅप्टन जावेद खान आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला, मेजर राठोड ला गोळी मारतो आणि स्वतःला स्वाधीन करतो. या कृत्याबद्दल जावेद खान रीतसर कोर्ट मार्शलला सामोरा जातो. तो शांत आहे. कारण एक भयाण सत्य त्याला माहिती आहे. चित्रपट सुरू होतो तो या घटनेवर. लष्करी कोर्ट रूम थरार भारतीय चित्रपट सृष्टीत फार कधीच हाताळला गेलेला नाही. सरकारी बाजू हा खटला सरळसोट आहे असे समजत असते. कॅप्टन जावेदचा बचाव करण्यासाठी लष्करी वकील सेवेतील मेजर सिद्धांत चौधरी (राहुल बोस) कडे खटला दिला जातो. मेजर चौधरी, सुरुवातीला हा खटला लवकरात लवकर निकाली काढून काश्मीर मध्ये निवांत वेळ काढण्याचे मनसुबे रचत असतो. त्या दरम्यान तो प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट देतो. त्याचबरोबर भेट होते ती त्या भागातील सर्वोच्च लष्करी अधिकारी ब्रिगेडिअर प्रताप (के के मेनन) ची. प्रताप शौर्याची, लष्करी शिस्तीची एक निराळी व्याख्या डोक्यात ठेऊन आहे. त्या रात्रीच्या कारवाईमध्ये सोबत असलेल्या कॅप्टन आर.पी.सिंग हा वरिष्ठांच्या दबावाखाली खटला दाबणारी, खोटी साक्ष देतो. पण त्याला ते सहन होत नाही. ती घुसमट त्याला अस्वस्थ करते. तो आपल्या लष्करी तळावरून नाहीसा होतो. मेजर चौधरीला अज्ञात जागी घेऊन जात, सत्य सांगतो जे कॅप्टन जावेद बोलायला तयार नसतो. मेजर चौधरी थेट ब्रिगेडिअर प्रतापला कोर्टात पाचारण करतो. ब्रिगेडिअर प्रताप तिथे साक्ष देताना आपल्या मनातील मुस्लिम द्वेषाची, भावना उघडपणे बोलून दाखवतो. काश्मिरातील हत्यार घेणारा प्रत्येक लहान-मोठा माणूस ठेचून काढला पाहिजे असे जहाल विचार मांडतो. ते जहाल विचार ऐकल्यानंतर कोर्ट मार्शल कॅप्टन जावेदला तात्काळ आदरपूर्वक मुक्त करते तर ब्रिगेडिअर प्रतापवर सदोष मनुष्यवध तसेच इतर आरोप ठेवत अटक करण्याचा आदेश देते. नक्की असे कोणते सत्य असते ज्यासाठी कॅप्टन जावेद आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला गोळी घालून मारतो? ते चित्रपटात पाहणे योग्य. त्यापलीकडे जात चित्रपट संपताना लष्कराकडून घडलेल्या अशा घटनांची यादी दिली आहे. या यादीपेक्षाही महत्वाची गोष्ट आहे ती ही की प्रत्येक घटनेची निःपक्षपाती चौकशी झाली, कितीही मोठा अधिकारी त्यात असला तरी जास्तीती जास्त शिक्षा देखील झाली. हे भारतीय लष्कराचे वेगळेपण आहे. त्यामुळेच भारतीय लष्कराची विश्वासार्हता कायम आहे. त्यामुळेच सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीत भारतीय लष्कराच्या अतिरिक्त तुकड्या काश्मीर मध्ये तैनात आहेत. तिथे तणावपूर्ण असली तरी शांतता आहे. 

 आता थोडेसे चित्रपटाविषयी. लष्करी तळावर घडलेली बेकायदेशीर घटना आणि त्यावरून झालेला लष्करी न्यायालयातील खटला हा प्रकार १९९२ साली आलेल्या 'अ फ्यु गुड मेन' या नितांतसुंदर चित्रपटात अतिशय छान हाताळलेला आहे. तपास करणारा, बचाव मांडणारा काहीसा खुशालचेंडू अधिकारी त्या चित्रपटात मांडला आहे तो टॉम क्रूजने. हा नाविक दलातील वकील न्यायालयाबाहेर खटले निकालात काढण्यास जास्त उत्सुक असतो. पण खटल्याचे गांभीर्य जसजसे वाढत जाते तसतसा तो अधिकारी प्रगल्भ होत जातो. हा अमेरिकन चित्रपट अमेरिकेच्या विशेष कमांडो सेना 'यूएस मरिन्स' मधील 'कोड रेड' या घटनाबाह्य, हिंसक अशा शिक्षेच्या प्रकरणावर आहे. त्यातगवंतानामो बे येथील लष्करी तळावरील घटना हा या चित्रपटाचा प्रमुख प्लॉट आहे. आता हे दोन चित्रपट पाहत असताना एक गोष्ट सहज लक्षात येईल ती म्हणजे 'शौर्य'चा प्लॉट 'अ फ्यु गुड मेन' वरून उचलला आहे. तो प्लॉट भारताच्या काश्मीरच्या वातावरणात आणून बसवला. खुशालचेंडू नायक तिथे टॉम क्रूज तर इथे राहुल बोस. (टॉम क्रूज आणि राहुल बोस यांची तुलना शक्यच नाही. कहा राजा भोज... ही भावना मनात येते. ) पात्र निर्मिती करताना ते पात्र थिल्लर वाटता कामा नये ही काळजी शौर्यच्या लेखक दिग्दर्शकांनी घेतलेली नाही. टॉम क्रूज, डेमी मूर आणि जॅक निकोलसन आपल्या भूमिका चोख पार पाडतात. शौर्य मध्ये बोस वगळता कॅप्टन जावेद साकारणारा दीपक डोब्रियाल,  सरकारी बाजू सांभाळणारा वकील म्हणून जावेद जाफरी आणि पडद्यावर काही मिनिटे असूनही अक्खा चित्रपट खाणारा के के मेनन. हे जग अशाच लोकांच्या जोरावर चाललं आहे जे 'राईट... राईट करण्याची करेज बाळगतात' हे राईट अधिक सक्षम करण्यासाठी व्यवस्था अधिक सक्षम करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने सकारात्मक पावले पडत आहेत. आपणही आपला वाट देऊया...

Comments

Popular posts from this blog

अथातो बिंब जिज्ञासा

अथातो ब्रह्म जिज्ञासा, असे म्हणत ऋषीमुनींनी या विश्वाचे रहस्य जाणून घेण्यासाठी गहन चर्चा केल्या. त्याचे रूपांतर वेद-उपनिषद, पुराणे यात झाले. त्यासोबतच एक प्रगल्भ समाज उभा राहिला, त्यांच्या पूजा पद्धती, उपासना पद्धती विकसित होत गेल्या. त्या क्रमाने विकसित होत निसर्ग-नैसर्गिक शक्तींची पूजा, यज्ञाद्वारे आहुती देणे ते प्रतीक निर्माण ते प्रतिमा निर्मिती इथवर पोचल्या. श्रेष्ठ मूर्तिविज्ञान साधक, संशोधक डॉ. गोरक्षनाथ तथा गो. ब. देगलूरकर, मांडतात, "ऋग्वेदात श्री विष्णूच्या संबंधी सहा ऋचा आहेत, त्या एका अर्थी विष्णूच्या 'शाब्दिक प्रतिमाच' आहेत. या शाब्दिक प्रतिमेचे प्रत्यक्ष प्रतिमेत रुपांतर करण्यासाठी पाषाण वापरले गेले. ते मग एका कुंपणाने बंदिस्त केले गेले. त्याला 'नारायण वाटक' म्हणू लागले" मूर्ती घडवणे, त्यांचे उपासना, पूजा यातील वाढते महत्त्व, त्यांचे अर्थ हा विषय गहन आहे तरीही उद्बोधक आहे. हाच देगलूरकर यांचा ध्यास आहे. तो आजवर अनेक पुस्तकांमधून समोर आला आहेच, त्यात 'अथातो बिंब जिज्ञासा' या टागोर फेलोशिप साठी लिहिलेल्या थिसीसची भर पडली आहे. तोच थिसीस मूर्ती,...

स्वातंत्र्यवीर सावरकरांची ईश्वरविषयक विचारप्रणाली

                                                'ईश्वर.' जगात जेवढे काही धर्म, जाती, पंथ, समुदाय इ. आहेत ते सगळे कुठल्यातरी ईश्वर नावाच्या अज्ञात शक्तीवर श्रद्धा ठेवून एकत्र आलेले असतात, स्थापन झालेले असतात. प्रत्येक धर्माच्या, जातीच्या ईश्वराबाद्द्लच्या, धार्मिक मान्यताविषयीच्या संकल्पना वेगळ्या असल्या तरी ते श्रद्धेवरच स्थापन झालेले असतात. कित्येक धर्माच्या संस्थापकांनी, तत्वज्ञांनी ईश्वराबद्दल लिहून ठेवलं आहे. हिंदुस्थानात ७००० वर्षांपासून अस्तित्वात असलेला धर्म-संस्कृती म्हणजे 'हिंदू'.  हिंदू धर्माला कोणताही संस्थापक नाही, धर्मग्रंथ नाही, पण हा धर्म वैदिक आर्यांच्या 'वेद' आणि 'उपनिषदे' यांवर आधारलेला आहे. मुळ 'यज्ञ' संकल्पनेनं ईश्वराचं अस्तित्व मानणाऱ्या हिंदू धर्मात कर्मकांडरुपी  थोतान्डावर  भाष्य केलं. ईश्वराच्या अस्तित्वालाच आव्हान देणारे कित्येक तत्वज्ञ होते पण मूळ वेदांचा सखोल अभ्यास करून हिंदू धर्मातील ईश्वराच्या अस्...

डॉ. आंबेडकरांचे आर्थिक चिंतन आणि वर्तमानातील प्रासंगिकता

एक प्रसिद्ध वचन आहे, "some are born great, some achieve greatness and some are those the greatness is thrust on them.." म्हणजे, काही जन्मतःच महान असतात. तर काही आपल्या कार्यातून, कृतीतून महत्पदाला पोचतात. तर काहींवर महानता लादली, थोपली गेलेली असते. प्रस्तुत विषयाला अनुसरून या वचनातला तिसरा भाग अप्रस्तुत आहे. माणूस जन्मतःच महान असतो का? ती जन्मजात महानता त्या माणसाच्या पुढील आयुष्यातील महत्कार्यामुळे सिद्ध होते. थोर, साक्षेपी विचारवंत कुरुंदकर मांडतात त्याप्रमाणे शिवाजी महाराज हे जन्मतःच महान होते असे आपण म्हणतो कारण महाराजांचे संपूर्ण महत्कार्य आपल्या समोर आहे म्हणून. याच न्यायाने भारतीय सामाजिक, राजकीय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक क्षेत्रात आपल्या कृतीतून, कार्यातून महत्पदाला पोचलेले महामानव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्या महामानवाचे महत्कार्य आपल्या समोर आहे, म्हणून आपण अभिमानाने म्हणून शकतो की ते जन्मताच महान होते.  भारतीय समाजमन माणसांना चौकटीत बसवण्यास उत्सुक असते. एकाच झापडबंद दृष्टीने व्यक्ती आणि कार्याकडे बघण्याचा प्रयत्न करते. पण याच भारताची दुसरी ...