Skip to main content

सिनेमा आणि सॉफ्ट पॉवर

 लष्करी बळ, सिनेमा आणि निर्माण होणारा दबदबा 


    एक निर्विवाद सत्य पहिल्या प्रथम मान्य करायलाच हवे ते म्हणजे सिनेमा म्हणजे सिनेमा, चित्रपट ही आजच्या काळातली लोककला आहे. अमिताभ बच्चनचा अँग्री यांग मॅन जितका महाराष्ट्रात गाजतो तितकाच दक्षिण भारतात, पूर्वोत्तर भारतात गाजतो. या चित्रपटकलेत तांत्रिक अंगासोबतच संगीत, नृत्य, नाट्य, शिल्प, चित्र अशा सर्व कलांचा समावेश होतो. चित्रपटाच्या कथानकांनुसार स्थानिक, पारंपरिक लौकिकार्थाने ज्याला लोककला म्हणता येतील अशांचा देखील अंतर्भाव होतो. ५०-६० चे दशक भारतीय चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ मानला जातो. त्या काळात अप्रतिम संगीताची मेजवानी असणाऱ्या प्रेमकथांपासून सामाजिक विषयावरील असामान्य चित्रपट निर्माण झाले. वास्तववादाची अवास्तव जाहिरात न करताही रूढार्थाने ज्याला व्यावसायिक म्हणता येईल असे सिनेमे निर्माण झाले. वास्तविक याची सुरुवात प्रभातच्या माणूस, कुंकू, शेजारी पासूनच झाली आहे. प्रभातच्या संत तुकारामने तर ३०-४० च्या दशकात जागतिक पातळीवर वाहवा मिळवली. पुढे 'सर पर लाल टोपी रुसी' म्हणणाऱ्या राज कपूरची लोकप्रियता सोव्हिएत काळात प्रचंड होती. भारतीय सॉफ्ट पॉवरच्या उभारणीत सिनेमांनी मोठी भूमिका बजावली आहे. त्याला तत्कलीन शीतयुद्धाचे संदर्भ अनेक आहेत. तत्कालीन चित्रपटसृष्टीत कम्युनिस्ट विचारसरणी असणारे, प्रत्यक्ष पक्ष कार्यकर्ते अनेक होते. भारताची तत्कालीन आर्थिक स्थिती, लष्करी सामर्थ्य (वेळोवेळच्या युद्धात अचाट पराक्रम गाजवला असला तरी) तुलनेने कमीच होते. आता भारताचे लष्करी आर्थिक, राजनयिक सामर्थ्य वाढत आहे. त्यामुळे चित्रपट विषयाचा, निर्मितीचा आवाका बदलू लागला आहे. 


          स्वातंत्र्यदिनाच्या महिन्यात केंद्र सरकारने काश्मीरबाबत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. याचे दूरगामी, सकारात्मक परिणाम दिसणार आहेत. तरीही स्वातंत्र्य चळवळीच्या आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या युद्धांचा, गुप्तचरांच्या अचाट पराक्रमाच्या कित्येक गाथांपैकी मोजक्याच मोठ्या  आल्या आहेत. त्यापैकी निवडक त्या दिवशी टीव्ही वर दाखवल्या जातात. किती काळ त्याच त्या चित्रपटांमध्ये अडकून राहणार? नवनिर्मिती, नवा दृष्टिकोन केव्हा येणार? वास्तविक जम्मू आणि काश्मीर विषयावर काही तुरळक, बरे म्हणावे असे चित्रपट येऊन गेले. मिशन काश्मीर, सिकंदर, हैदर हे चित्रपट आले. पण त्यांच्या कथानकांचा एकूण कल फुटीरवादाच्या कडे दिसून येतो हे  नाकारता येणार नाही. काश्मीरच्या प्रश्नावरून भारत आणि पाकिस्तान दरम्यान चार युद्धे झाली. तसेच १९६२ मध्ये चीनबरोबर झालेले युद्ध. भारताचा या युद्धात लाजिरवाणा पराभव झाला असला तरी सैन्याने अतुलनीय पराक्रम गाजवलेला आहे. प्रत्येक युद्धात भारतीय सैन्याने अतुलनीय शौर्याबरोबरच नैतिकतेचाही परिचय घडवलेला आहे. १९४७ च्या काश्मीर युद्धातील मेजर सोमनाथ शर्मा, मेजर राघोबा राणे यांचा पराक्रम अतुलनीय आहे. १९६२ च्या युद्धात रायफलमॅन जसवंत सिंग, शैतान सिंग यांच्या कथा अतुलनीय आहेत. भारताच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासातील फाइनेस्ट आवर म्हणता येईल असे १९७१ चे युद्ध. यातील पायदळ, नौदल आणि वायुदलाच्या एकेक पराक्रम आहे. सानी सर्वात महत्वाचे म्हणजे गुप्तचर यंत्रणांचा पराक्रम. अशा शौर्यगाथांची संख्या प्रचंड आहे. या शौर्यगाथांवर कितीसे चित्रपट भारतात निर्माण झाले? या शौर्यगाथा घडत होत्या तेव्हा भारतीय चित्रपटसृष्टीत नायक नायिकांच्या मागे गाणी गात हिंडत होते. प्रेमभंग झाल्यावर मदनमोहनच्या गजला गात होते. पॅलेस्टाईन आणि जर्मन दहशतवाद्यांनी फ्रेंच विमानाचे अपहरण करून उगांडामध्ये अपहरण नाट्य घडवले. इस्रायली कमांडोनी अचाट पराक्रम करून सर्व ओलीसांना सोडवून आणले. ही घटना १९७६ ची आहे. ती शौर्यगाथा सांगणारा अप्रतिम चित्रपट १९८२  आला. आपण का नाही करत? या शौर्यगाथा वेळीच आजच्या लोककलेमार्फत सर्वदूर पोचवली नाही तर पुढील पिढयांना प्रेरणा देणाऱ्या, राष्ट्रीय भावना जागृत, वृद्धिंगत करणाऱ्या गाथा विस्मृतीत जाण्याची शक्यता बळावते. 
          आज अमेरिका, रशिया, युके, इस्राईल इत्यादी देशांचे लष्कर, गुप्तचर संघटना यांबद्दल एक सुप्त आकर्षण, त्यांचा दबदबा जगभरात आहे. त्यामागे यांची आर्थिक, लष्करी बळ हे कारण आहेच. पण त्या त्या देशातील चित्रपटसृष्टीने आणि हॉलिवूडने त्यांच्या प्रतिमानिर्मितीत मोलाची भूमिका बजावली आहे. व्हिएतनाम युद्धवर आधारित 'वि वेअर सोल्जर्स' पासून ते त्याच युद्धाबद्दल अमेरिकी सरकार कसा खोटारडेपणा करत आहे याची लक्तरं बाहेर काढणाऱ्या वर्तमानपत्रावर आधारित 'द पोस्ट' अशी चित्रपटांची मोठी रेंज आहे. पहिले आणि दुसरे महायुद्ध हे तर हक्काचे विषय आहेत. 'ब्रिज टू फार' ते सेव्हिंग प्रायव्हेट रायन ते डी डे ते एनेमी ऐट द गेट्स अशी मोठी यादी आहे. अलीकडच्या काळातील हर्ट लॉकर ते ओसामा बिन लादेनला मारण्याची मोहीम दाखवणारा 'झिरो डार्क थर्टी' यादी करावी तेढी थोडी आहे. युकेच्या 'एमआय ६' या गुप्तचर संस्थेच्या प्रतिमानिर्मितीत जेम्स बॉण्डचा मोठा वाटा आहे.          
          भारतीय चित्रपटसृष्टी या बाबतीत खूपच मागे आहे. यादीच करायला लागलो (चांगल्या चित्रपटांची) तर 'हकीकत' आणि त्यांनतर थेट 'बॉर्डर'. त्यानंतर थेट राझी, उरी:द सर्जिकल स्ट्राईक, गाझी अटॅक, परमाणू, मद्रास कॅफे हीच नावे डोळ्यासमोर येतात. मधले 'लक्ष, एल.ओ.सी. कारगिल' वगैरे असले तरी त्यांच्या कथानकाविषयी मत वेगळे आहे. आगामी काळात कॅप्टन विक्रम बात्राची शौर्यगाथा सांगणारा 'शेरशहा', फिल्ड मार्शल जनरल सॅम माणेकशॉ यांच्यावर आधारित 'सॅम' असे सिनेमे येत आहेत. वास्तविक विषय, कथा अनेक आहेत. पण त्यांवर चित्रपट बनत नाहीत. वैचारिक लढाईच्या नादात आपण काय गमावतो याचे भान राहत नाही. काही वर्षांपूर्वी फौकलँड युद्धाची पार्श्वभूमी असणारा मार्गारेट थॅचर यांचा चरित्रपट 'आयर्न लेडी' येऊन गेला. त्यासाठी मेरील स्ट्रीप या अभिनेत्रीला ऑस्कर पुरस्कार देखील मिळाला. तुलना अप्रस्तुत, अवाजवी वाटली तरी एक गोष्ट मान्य केलीच पाहिजे ती म्हणजे एक नवा देश जन्माला घालणाऱ्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे १९७१ च्या युद्धातील नेतृत्व निःसंशय वरचढ ठरते. आपण आपल्या 'दुर्गे'ची गाथा मांडायला कचरतो का? भारताचा आर्थिक, लष्करी, दबदबा आता वाढू लागला आहे. त्याचवेळी राष्ट्रवाद, लष्करी सामर्थ्यावर विश्वास असणाऱ्या राजकीय पक्षाचे सरकार केंद्रात सत्तेवर आहे. याच काळात अशा प्रकारचे चित्रपट येत आहेत. निवळ योगायोग म्हणता येणार नाही. वास्तविक देशाचा दबदबा वाढवायचा असेल, सॉफ्ट पॉवर निर्माण करायची असेल तर आधुनिक काळातील ही लोककला तितक्याच खुबीने वापरता यायला हवी. ती वापरली जात आहे  याचा आनंद आहे. 

Comments

Popular posts from this blog

अथातो बिंब जिज्ञासा

अथातो ब्रह्म जिज्ञासा, असे म्हणत ऋषीमुनींनी या विश्वाचे रहस्य जाणून घेण्यासाठी गहन चर्चा केल्या. त्याचे रूपांतर वेद-उपनिषद, पुराणे यात झाले. त्यासोबतच एक प्रगल्भ समाज उभा राहिला, त्यांच्या पूजा पद्धती, उपासना पद्धती विकसित होत गेल्या. त्या क्रमाने विकसित होत निसर्ग-नैसर्गिक शक्तींची पूजा, यज्ञाद्वारे आहुती देणे ते प्रतीक निर्माण ते प्रतिमा निर्मिती इथवर पोचल्या. श्रेष्ठ मूर्तिविज्ञान साधक, संशोधक डॉ. गोरक्षनाथ तथा गो. ब. देगलूरकर, मांडतात, "ऋग्वेदात श्री विष्णूच्या संबंधी सहा ऋचा आहेत, त्या एका अर्थी विष्णूच्या 'शाब्दिक प्रतिमाच' आहेत. या शाब्दिक प्रतिमेचे प्रत्यक्ष प्रतिमेत रुपांतर करण्यासाठी पाषाण वापरले गेले. ते मग एका कुंपणाने बंदिस्त केले गेले. त्याला 'नारायण वाटक' म्हणू लागले" मूर्ती घडवणे, त्यांचे उपासना, पूजा यातील वाढते महत्त्व, त्यांचे अर्थ हा विषय गहन आहे तरीही उद्बोधक आहे. हाच देगलूरकर यांचा ध्यास आहे. तो आजवर अनेक पुस्तकांमधून समोर आला आहेच, त्यात 'अथातो बिंब जिज्ञासा' या टागोर फेलोशिप साठी लिहिलेल्या थिसीसची भर पडली आहे. तोच थिसीस मूर्ती,...

स्वातंत्र्यवीर सावरकरांची ईश्वरविषयक विचारप्रणाली

                                                'ईश्वर.' जगात जेवढे काही धर्म, जाती, पंथ, समुदाय इ. आहेत ते सगळे कुठल्यातरी ईश्वर नावाच्या अज्ञात शक्तीवर श्रद्धा ठेवून एकत्र आलेले असतात, स्थापन झालेले असतात. प्रत्येक धर्माच्या, जातीच्या ईश्वराबाद्द्लच्या, धार्मिक मान्यताविषयीच्या संकल्पना वेगळ्या असल्या तरी ते श्रद्धेवरच स्थापन झालेले असतात. कित्येक धर्माच्या संस्थापकांनी, तत्वज्ञांनी ईश्वराबद्दल लिहून ठेवलं आहे. हिंदुस्थानात ७००० वर्षांपासून अस्तित्वात असलेला धर्म-संस्कृती म्हणजे 'हिंदू'.  हिंदू धर्माला कोणताही संस्थापक नाही, धर्मग्रंथ नाही, पण हा धर्म वैदिक आर्यांच्या 'वेद' आणि 'उपनिषदे' यांवर आधारलेला आहे. मुळ 'यज्ञ' संकल्पनेनं ईश्वराचं अस्तित्व मानणाऱ्या हिंदू धर्मात कर्मकांडरुपी  थोतान्डावर  भाष्य केलं. ईश्वराच्या अस्तित्वालाच आव्हान देणारे कित्येक तत्वज्ञ होते पण मूळ वेदांचा सखोल अभ्यास करून हिंदू धर्मातील ईश्वराच्या अस्...

डॉ. आंबेडकरांचे आर्थिक चिंतन आणि वर्तमानातील प्रासंगिकता

एक प्रसिद्ध वचन आहे, "some are born great, some achieve greatness and some are those the greatness is thrust on them.." म्हणजे, काही जन्मतःच महान असतात. तर काही आपल्या कार्यातून, कृतीतून महत्पदाला पोचतात. तर काहींवर महानता लादली, थोपली गेलेली असते. प्रस्तुत विषयाला अनुसरून या वचनातला तिसरा भाग अप्रस्तुत आहे. माणूस जन्मतःच महान असतो का? ती जन्मजात महानता त्या माणसाच्या पुढील आयुष्यातील महत्कार्यामुळे सिद्ध होते. थोर, साक्षेपी विचारवंत कुरुंदकर मांडतात त्याप्रमाणे शिवाजी महाराज हे जन्मतःच महान होते असे आपण म्हणतो कारण महाराजांचे संपूर्ण महत्कार्य आपल्या समोर आहे म्हणून. याच न्यायाने भारतीय सामाजिक, राजकीय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक क्षेत्रात आपल्या कृतीतून, कार्यातून महत्पदाला पोचलेले महामानव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्या महामानवाचे महत्कार्य आपल्या समोर आहे, म्हणून आपण अभिमानाने म्हणून शकतो की ते जन्मताच महान होते.  भारतीय समाजमन माणसांना चौकटीत बसवण्यास उत्सुक असते. एकाच झापडबंद दृष्टीने व्यक्ती आणि कार्याकडे बघण्याचा प्रयत्न करते. पण याच भारताची दुसरी ...