भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थातच इसरो पन्नासाव्या वर्षात आहे. केरळातील कालडी च्या प्रदेशात तुटपुंज्या निधीच्या आधाराने भारतीय अवकाश संशोधन मोहिमेचा प्रारंभ झाला. सुरुवात पेन्सिलीच्या आकाराच्या हवामान अभ्यास करणाऱ्या रॉकेटपासून झाली. त्यानंतर रॉकेटचा आकार, त्या रॉकेटचे उद्देश मोठे होत गेले. पहिले मोठे रॉकेट भारतीय शास्त्रज्ञांनी सायकलवरून, पहिला उपग्रह बैलगाडीतून योग्य त्या स्थळी पोचवला आहे. भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमाचे पितामह डॉ. विक्रम साराभाई आणि इतर शास्त्रज्ञांनी १९६९ साली सुरू केलेल्या रोपाचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. १९६९ साली सुरुवात केल्यांनतर पहिला दूरसंचार उपग्रह 'आर्यभट्ट' १९७५ मध्ये सोडण्यात आला. त्या पुढला उपग्रह 'रोहिणी' १९७९ मध्ये सोडण्यात आला. पेन्सिलीच्या आकाराचे रॉकेट ते संपूर्ण उपग्रह हा पहिला पल्ला अवघ्या ६ वर्षात गाठला गेला. भारताची तोळामासा आर्थिक स्थिती हे एकमेव कारण भारताच्या 'लो बजेट' अवकाश कार्यक्रमामागे नव्हते. त्याला शीतयुद्ध, भारताची अलिप्ततावादी परराष्ट्र नीती आणि १९७१ पासून पुढे उघडपणे रशियाकडे झुकलेले धोरण यामुळेही अनेक मर्यादा आल्या. भारताने आपले सुरुवातीचे अनेक उपग्रह रशियाच्या मदतीने, रशियाच्या अवकाश प्रक्षेपण स्थळांवरून पाठवले. या सर्व वाटचालीत इन्सॅट वगैरे उपग्रह आणि सॅटेलाईट लाँच वेहिकल ते जिओसिंक्रोनास सॅटेलाईट लाँच वेहिकल हा प्रदीर्घ पल्ला आहे. या सर्व काळात अनेक वेळा अपयश, टीका सर्व काही झाले आहे. पण इसरोने कायम प्रगतीच केली आहे. ही प्रगती करत इसरो स्क्रमजेत इंजिन, चांद्रयान, चांद्रयान २, गगनयान इत्यादी महत्वाकांक्षी मोहीम राबवत आहे. त्यातलीच एक महत्वाकांक्षी मोहीम म्हणजे मंगळयान किंवा मार्स ऑर्बिटर मिशन. अवतार सारख्या हॉलिवूड चित्रपटांच्या बजेटपेक्षाही कमी किंमतीत, पहिल्याच प्रयत्नात मंगळ मोहीम यशस्वी करणारा भारत हा पहिला देश आहे. इसरोच्या या कामगिरीवर आधारित चित्रपट 'मिशन मंगल' नुकताच आला आहे आणि तिकीटबारीवर यश मिळवतो आहे.
चित्रपटाची सुरुवात होते इसरोच्या महत्वाकांक्षी जीएसएलव्ही रॉकेटच्या चाचणीच्या प्रसंगाने. काही तांत्रिक बिघाडामुळे ही चाचणी अयशस्वी ठरते. त्यामुळे इसरो आणि मिशन डिरेक्टर राकेश धवन (अक्षय कुमार) यांच्यावर माध्यमातून, एकूण जगातून टीका होऊ लागते. इसरो हाती घेणार असलेल्या महत्वाकांक्षी मंगळ मोहिमेसाठी हे रॉकेट आणि त्याची ताकद महत्वाची असते. त्या रॉकेटची चाचणी अयशस्वी ठरल्यामुळे मंगळ मोहीम देखील थांबते. तेव्हा राकेश धवन आणि प्रोजेक्ट डिरेक्टर तारा शिंदे (विद्या बालन) पीएसएलव्ही हे कमी ताकदीचे रॉकेट वापरून मंगळ मोहीम राबवण्याची योजना आखतात. त्यासाठी कोणत्या प्रकारच्या युक्त्या वापरतात, मुळातच कमी असणारे बजेट अर्ध्यावर आणले गेल्यावर यानाचा आकार, वजन, त्यासाठी वापरण्याच्या वस्तू यांच्या खर्चात नानाविध युक्त्या वापरून कपात करण्यात आणि मोहीम राबवण्यात सर्व टीम कशी यशस्वी ठरते याची रंजक कहाणी या चित्रपटात मांडण्यात आली आहे. चित्रपट अतिशय रंजक आहे. यात वाद नाही. काही ठिकाणी अतिरंजितता आहे. अर्थात अशा प्रकारच्या चित्रपटात ती नसेल तर असे चित्रपट डॉक्युमेंटरी होऊन जातात. काही जण देशप्रेमाचा अति उद्घोष असा आक्षेपदेखील घेऊ शकतील. सर्व टीका टिप्पण्या बाजूला ठेवल्या तरी एक गोष्ट पुन्हा एकदा अधोरेखित करणे आवश्यक आहे की आपल्याच देशाच्या गौरवगाथा आपण उपलब्ध साधनानिशी का मांडू नयेत?
चित्रपटात प्रोजेक्ट डिरेक्टर म्हणून विद्या बालन प्रमुख व्यक्तिरेखेत आहे. त्याचबरोबर प्रॉपल्शन इंजिनिअर, कम्युनिकेशन एक्स्पर्ट, फ्युएल इत्यादी विभाग समर्थपणे हाताळणाऱ्या स्त्रिया आहेत. या व्यक्तिरेखा कीर्ती कुल्हारी, नित्या मेनन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा यांनी उभ्या केल्या आहेत. मूळ मंगळयान मोहिमेत सर्व प्रमुख जबाबदाऱ्या महिला शास्त्रज्ञांनी निभावल्या होत्या. मिशन मंगल चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सामाजिक क्षेत्रात एक चर्चा प्रामुख्याने सुरु झाली ती अशी की स्त्रीवाद बेछूट, स्वछंदी वागण्यात नाही, भारतीय पारंपरिक पेहराव नाकारण्यात किंवा त्यावर जुनाट, पुरातन वगैरे टीका करण्यात नाही. इसरो मध्ये काम करणाऱ्या बहुतांश महिला शास्त्रज्ञ भारतीय पारंपरिक पेहरावात वावरतात. त्यामुळे त्यांच्या कार्यावर, कर्तृत्वावर, आधुनिकतेवर कुठलाही प्रश्न उपस्थित करता येणार नाही. काही दिवसांपूर्वी माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर देखील हा मुद्दा प्रकर्षाने चर्चेत आला होता. याचा अर्थ आधुनिक किंवा अधिक स्पष्टपणे सांगायचे तर पाश्चात्य पेहराव वाईट असा होत नाही. दुसरा मुद्दा प्रत्येक व्यक्तिरेखेचे खासगी जीवन. शर्मन जोशीने साकारलेली व्यक्तिरेखा कुंडली वगैरे वर विश्वास असणारा, मंगळाची दशा दूर व्हावी म्हणून नवग्रह शांती करणारी आहे. कुठलीही चाचणी होताना, मोठ्या मोहिमेसाठीचे प्रक्षेपण होताना सर्व शास्त्रज्ञांच्या अवतीभोवती, वैज्ञानिक वातावरणात साग्रसंगीत पूजा देखील होते. तारा शिंदे (विद्या बालन) ह्या पात्राच्या तोंडी 'विज्ञानाच्या पलीकडेही एक शक्ती आहे आणि त्याचा आदर, पूजा करतो' असा संवाद आहे.
विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात नारी शक्ती आघाडीवर आहे. त्याच नारी शक्तीला गर्भातच मारून टाकण्याची वृत्ती आजदेखील जिवंत आहे. देशाच्या उन्नतीसाठी वैज्ञानिक प्रगती आवश्यक आहे. ती वैज्ञानिक प्रगती होतच आहे. त्यासोबतच लोकांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन वाढणे गरजेचे आहे. अशा प्रकारच्या चित्रपटांमधून तो वाढेल असे समजणे दूधखुळेपणाचे ठरेल. पण अशा प्रकारचे चित्रपट अधिकाधिक येत राहणे गरजेचे आहे. देशाची गौरवगाथा पोचवलीच पाहिजे. त्यासाठी चित्रपट हे प्रभावी माध्यम आहे. त्याचा प्रभावी वापर होत आहे हे आनंदाचे लक्षण आहे.
Comments
Post a Comment