फर्जंद ते फत्तेशिकस्त
शिवाजी, भारताच्या इतिहासातील युगप्रवर्तक राजा. यादव, विजयनगर या साम्राज्यांच्या पाडावानंतर एक अहोम राज्य वगळता सर्वत्र मुसलमानी राजवट कायम झाली होती. एतद्देशीय मराठा, राजपूत आणि इतर सर्व सरदार घराणी तालेवार होती, मातब्बर होती पण त्यांच्या आपापसात लढाया होत असत. एकमेकांच्या लग्नाच्या वऱ्हाडांवर हल्ले केले जात असत. एकमेकांत वैर असले तरी चाकरी मात्र इमाने इतबारे बादशहाची करत असत. या सर्वात स्वातंत्र्याकांक्षी एक घराणे आले ज्यांनी इतिहासाचे पाट बदलले. शहाजी राजांनी स्वराज्याच्या अयशस्वी प्रयत्न केला. पण पुढे जात बंगळुरू, तंजावर येथे जवळ जवळ स्वायत्त असे राज्य उभारले. इकडे महाराष्ट्रात मात्र शिवाजी राजांनी मावळातल्या सामान्य माणसांना एकत्र करत, त्यांच्यातून नवे सरदार घडवत एक स्वराज्य स्थापन केले. ते स्वराज्य रयतेचे राज्य होते. ते स्वराज्य व्हावे ही 'श्रीं'ची इच्छा या भावनेतून उभारणी झाली होती. या स्वराज्यस्थापनेचा अचाट पराक्रम पाहून गागाभट्टांसारख्या प्रकांड पंडिताने राज्याभिषेकाची कल्पना मांडली आणि ती तडीस नेली. त्यासाठी एक नवा ग्रंथ शिवराज्याभिषेक प्रयोग सिद्ध केला. ही सर्व दैदिप्यमान गाथा इतकी सरळसोट नाही. अनेक खाचखळगे आणि जय-पराजयाचा चक्रातून हे उभे राहिले. आपल्या उण्यापुऱ्या ५० वर्षांच्या आयुष्यात शिवाजी महाराजांनी अनेक वेळा स्वतः ज्याला 'लिडिंग फ्रॉम द फ्रंट' म्हणतात अशा प्रकारे साहसी कारवाया केल्या आहेत. त्यात अफझल वध, सुरत लूट, आग्रा आणि सर्वात थरारक म्हणता येईल अशी पुण्यातील लाल महालवरील धाड अशा अचाट कारवाया आहेत. एकेक प्रसंग, मोहीम ही खूप काही शिकवणारी आणि आजच्या काळातही उपयुक्त आहे. त्यातील लाल महाल, शाहिस्ताखानाची शास्त या विषयावर आधारित हा चित्रपट आहे फत्तेशिकस्त.
शिवाजी महाराजांनी अफझल वधानंतर आश्चर्याचा भर ओसरायच्या आत पन्हाळ्यावर धडक मारली. पण सिद्दी जौहर सारख्या कसलेल्या सेनानीने पन्हाळ्याला वेढा दिला. त्या वेढ्यातून शिताफीने करून घेतलेली सुटका आणि घोडखिंडीचा प्रसंग एका बाजूला आणि त्याचवेळी आलमगीर औरंगजेबाचा मामा शाहिस्ताखान याच्या लाखावर असलेल्या फौजेचा पुणे परिसरात धुमाकूळ. शाहिस्ताखाला एक चाकणचा संग्रामदुर्ग वगळता कुठेही लक्षणीय यश मिळालेले नाही. म्हणून खानाची फौज मुलुख बेचिराख करत आहे. त्यावेळी कोकण किनारपट्टीवर ताबा घेण्यासाठी कारतलबखान उझबेक याला फौज देऊन पाठवले जाते. लोहगडाजवळील उंबरखिंडीत घात लावून कारतलबखानाच्या फौजेला सळो की पळो करून गुडघे टेकायला भाग पाडले. त्यानंतर सुरू केली तो प्रत्यक्ष लाल महालावर धाड घालण्याची योजना. उंबरखिंड ते लाल महाल हा मोठा पट लेखक-दिग्दर्शक दिक्पाल लांजेकर यांनी या चित्रपटात मांडला आहे. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्वपूर्ण अशा प्रसंगांवर ५ चित्रपटांची मालिका करण्याचा लांजेकर यांचा मानस आहे. त्यातील पहिला, फर्जंद, जो कोंडाजी फर्जंद आणि अनाजी दत्तो यांनी अवघ्या साठ जणांनिशी काही हजार फौज असणाऱ्या पन्हाळ्यावर, फौजेला जाग आणून पन्हाळा जिंकला त्या अफाट कामगिरीवर आधारित आहे. त्याच मालिकेतील हा दुसरा फत्तेशिकस्त.
लांजेकर यांनी चित्रपट उभे करताना सुरुवातीलाच एक सूचना केली आहे की हे ऐतिहासिक दस्तऐवज नाही. पण पुराव्याने सिद्ध झालेल्या ऐतिसाहिक घटनांवर आधारित प्रेरणादायक चित्रपट आहेत. त्यामुळे काही तपशिलाच्या चुका असल्या तरी त्या संजय लीला भन्साळी सारख्या छछोर नाहीत. मान्य होण्यासारख्या आहेत. लांजेकर यांच्या दोन्ही चित्रपटांचे महत्व सांगता येईल ते असे की एकंदर मोहिमेचा खूप सर्वांगीण विचार आणि मांडणी त्यांनी केली आहे. शिवाजीचा गुप्तहेर यंत्रणेवरील भर, विरोधी गोटातील प्रत्येक बारीक सारीक माहितीवर आधारित अचूक योजना आणि अंमलबजावणी, माणसांची अचूक निवड या गोष्टी दिसून येतात. फत्तेशिकस्त चित्रपटात बहिर्जी नाईक, किसना आणि केसर या व्यक्तिरेखा ताकदीने उभ्या केल्या आहेत. फर्जंद या चित्रपटात बहिर्जी नाईकांची भूमिका प्रसाद ओक यांनी केली होती तर फत्तेशिकस्त चित्रपटात ही भूमिका हरीश दुधाडे याने केली आहे. वेषांतर, लोककला, भाषा यांवरील प्रभुत्व यामुळे हे गुप्तहेर शत्रूच्या आतल्या गोटात शिरू शकत असत. लाल महालावरील धाडीत शिवाजी महाराजांनी लाल महाल माहिती असणारी, लहान पणापासून सोबत वावरलेली अशी माणसे घेतली होती. तान्हाजी, चिमणाजी-बाळाजी देशपांडे बंधू, कोयाजी बांदल, सर्जेराव जेधे अशी मंडळी या मोहिमेत निवडली गेली. अचूक नियोजनामुळे लाखाच्या फौजेत थेट लाल महालात शिरून कारवाई करून निसटून येणे ही कामगिरी तर बजावलीच पण त्यानंतर होणार संभाव्य पाठलाग लक्षात घेऊन 'कात्रजचा घाट' करणे या योजनाही तयार होत्या.
फर्जंद काय किंवा फत्तेशिकस्त काय, दोन्ही चित्रपट आपल्याला बांधून ठेवतात. फत्तेशिकस्त चित्रपटाच्या काही भागाचे चित्रीकरण प्रत्यक्ष राजगडावर केले आहे. आजच्या पिढीपर्यंत हा इतिहास चित्रपट या सर्वश्रेष्ठ लोक माध्यमातून पोचवणे आवश्यक आहे. पन्नास आणि साठच्या दशकात भालजी पेंढारकर यांनी मराठा तितुका मेळवावा, छत्रपती शिवाजी आणि अनेक चित्रपटांची मालिका दिली. तत्कालीन संदर्भात ते चित्रपट आवश्यक होते. पण त्यानंतर चित्रपट विषयांचा सांधा बदलला. आज सामाजिक स्तरावर जातीय फूट आणि इतर विषय गलिच्छ पातळीवर मांडले जात आहेत. त्यावरून सामाजिक घुसळण मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच वैचारिक पातळीवर 'भारतीय' पणा त्याला आपापल्या धारणेनुसार हिंदुत्ववादी म्हणा, भारतीय म्हणा किंवा नवा इंग्रजी शब्द 'इंडिक' म्हणा मूळ धरू लागला आहे. मुखतः डावा, समाजवादी समाज रचनेचा विचार सरकार, प्रमुख राजकीय पक्ष, ज्याला इंटलीजींशिया म्हणतात अशा पातळीवर होता तेव्हा तो विचार मांडणारे चित्रपट आले. त्या पद्धतीचे 'समांतर' चित्रपट म्हणजेच काहीतरी ग्रेट अशा पद्धतीची भावना नकळतपणे रुजवली गेली. आजही ती बहुतांशी कायम आहे. ठोस विचार लोकप्रिय चित्रपट, कलाकृतीतून मांडता येतो हे अनेक कलाकृतींतून दाखवून दिले आहे. ठोस विचारांबरोबरच 'भारतीय' इतिहासातील असामान्य घटना, व्यक्तींपासून अर्वाचीन काळातील भारताच्या विजयगाथा अधिकाधिक समोर येणे आवश्यक आहे. उरी, परमाणू, मद्रास कॅफे, रॉ (जॉन अब्राहाम), बाहुबली, टॉयलेट एक प्रेम कथा, सुई धागा, पॅडमॅन ते मराठीत फर्जंद, फत्तेशिकस्त, तेलगू मध्ये गौतमीपुत्र सातकर्णी अशी मालिकाच्या मालिका येत राहणे आवश्यक आहे. भारताचा भारतीय पणा, श्रेष्ठत्व जगावर आणि मुख्य भारतीय मनावरच ठसवण्याची गरज आहे. म्हणूनच अशा पद्धतीचे चित्रपट येत राहणे गरजेचे आहे. एक चित्रपट केवळ दोन तासाची करमणूक उरात नाही. उरू नयेत.
भारतीय विचारांची, संस्कृतीची नव्या तंत्रज्ञानाची सांगड घालत जगाच्या पटलावर फत्ते होणार हे नक्की. त्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न होत राहणे गरजेचे. चित्रपटसृष्टी आपल्या परीने करत आहे. आपणही करूयात....
छान लिहिलंय
ReplyDelete