वीरप्पन: क्रूरकर्म्याचा थरारक माग
तामिळनाडू स्पेशल टास्क फोर्सचे तत्कालीन प्रमुख के. विजय कुमार यांची विजयी गाथा
१४ हजार चौरस किलोमीटरचे कर्नाटक, तामिळनाडू केरळ राज्यांच्या सीमावर्ती प्रदेशातील डोंगराळ, घनदाट जंगलांचा प्रदेश. एकीकडे उटी हे लोकप्रिय थंड हवेचे ठिकाण, तेथील चहाचे मळे दुसरीकडे मदुमलाई, बांदीपूर चे जंगल तर एम एम डोंगर, कावेरी नदीचं खोरं असा प्रचंड प्रदेश. चहा, उत्कृष्ट प्रतीचे चंदन, ग्रॅनाईट खडकांच्या खाणी आणि हस्तिदंत याचा अवैध व्यापार, शिकार यामुळे अस्वस्थ असणारा प्रदेश. त्यातच आपली अंगभूत हुशारी, अखंड सावध, संशयी आणि जवळ जवळ अखेरच्या क्षणापर्यंत असलेली नशिबाची साथ या जोरावर एक क्रूरकर्मा त्या भागात निर्माण झाला. चंदन तस्करी, हत्तीची शिकार यातून झालेली सुरुवात अपरिहार्यपणे वन खात्याशी संपर्क आणणारी ठरते. तिथे एक तर संगनमत किंवा संघर्ष अशा दोन शक्यता संभवतात. इथे संघर्ष उभा राहिला. अगदी सुरुवातीच्या काळात झालेल्या अटकेतून विलक्षण चतुराईने करून घेतलेली सुटका यामुळे स्थानिक आदिवासी आणि गावांमध्ये एक रॉबिनहूड सारखी प्रतिमा तयार झाली. ती प्रतिमा अंगभूत हुशारी आणि प्रचारामुळे अधिक गहिरी करण्याच्या कौशल्यामुळे एक दहशततीचा, एका लिजंडचा मदुमलाई आणि आसपासच्या जंगलात एका दंतकथेचा जन्म झाला. कोसे मुनीसमी वीरप्पन या नावाची ही दंतकथा, दहशत संपुष्टात आणण्यासाठी ४० हुन अधिक पोलीस, स्पेशल टास्क फोर्स कमांडो, वनसंरक्षक आणि शेकड्याच्या आकड्यात सामान्य माणसांनी आपले प्राण गमावले. वीरप्पन आणि त्याची टोळी संपवण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडू राज्य सरकारांनी संयुक्त कृती दले उभारली. या कृती दलांना वीरप्पनची टोळी संपवण्यासाठी ११ वर्षांपेक्षा अधिक काळ लागला. घनदाट जंगलात एकमेकांविरुद्ध सुरु असलेला हा सामना १८ ऑक्टोबर २००४ च्या रात्री नाट्यमय कमांडो कारवाईने संपला. ही कारवाई १९७५ च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी के. विजय कुमार यांनी यांनी प्रत्यक्षात उतरवली. त्या असामान्य, चित्तथरारक पाठलागाची कहाणी के. विजय कुमार यांनी 'Verappan: Chasing The Brigand (मराठी अनुवाद वीरप्पन विरुद्ध विजय कुमार) या पुस्तकात मांडली आहे.
वीरप्पन. सुरुवात चंदन तस्करीपासून केलेली असली तरी पुढे हस्तिदंत तस्करी, ग्रॅनाईट खाण मालकांकडून खंडणी आणि पुढे जात मोठमोठ्या व्यक्तींचे अपहरण करून खंडणी इथपर्यंत त्याच्या कारवायांची वाढ झाली. चंदन तस्करीमुळे कर्नाटक आणि तामिळनाडू राज्य सरकारचा महसूल बुडत होता. मोठ्या वन क्षेत्रावर त्याची दहशत असल्यामुळे वाहतूक आणि इतर सुविधा यांच्या वाढीवर मर्यादा येत होत्या. वीरप्पनने आपल्या हुशारीने त्या परिसरातील इतर शिकारी टोळ्या एक तर नेस्तनाबूत केल्या किंवा आपल्या टोळीत सामील करून घेतल्या. सततची खंडणीखोरी आणि इतर कारणे लक्षात घेऊन कर्नाटक सरकारने त्या भागातील ग्रॅनाईट खाणी बंद केल्या. त्या खाणीत काम करणारे कामगार त्यामुळे बेकार झाले. त्या बेरोजगारीचा सगळा ठपका वीरप्पनवर न येता राज्य सरकारवर पडला किंवा वीरप्पनने तो पाडला. त्या बेकार कामगारांतले अनेक जण पुढे वीरप्पनच्या टोळीत सामील झाले. एका बाजूला ही तस्करी आणि खंडणीखोरी तर दुसऱ्या बाजूला एलटीटीई सकट अनेक तामिळ बंडखोर संघटनांशी संधान बांधत .३०३ पासून ते ए के ४७ पर्यंत अनेक बंदुका त्याच्या टोळीकडे आल्या होत्या. जेव्हा पोलीस आणि स्पेशल टास्क फोर्सने त्याच्या विरुद्ध कारवाई तीव्र केली तेव्हा चवताळून जात वीरप्पनने तामिळनाडूमध्ये एक आणि कर्नाटक राज्यात एक अशा पोलीस ठाण्यांवर हल्ला करत शस्त्रागार लुटलंच शिवाय तिथले पोलीस मारले. वीरप्पनने आपल्या आयुष्यात अनेक अपहरणे केली पण त्याला सर्वाधिक लोकप्रियता मिळवून दिली ती कन्नड चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय नट राजकुमार यांच्या अपहरणाने. वीरप्पनने राजकुमार यांच्या बांदीपूर जंगलाजवळच्या फार्म हाउसवरून त्यांचे अपहरण केले. त्यांच्या अपहरणामुळे कर्नाटक आणि तामिळनाडू राज्य सरकारांवर प्रचंड दबाव आला. वीरप्पनने राजकुमार यांना कुठलीही इजा केली नाही. पण त्यांच्या सुटकेसाठी केलेल्या मागण्या अतिशय चतुराईने केलेल्या होत्या. शिवाय त्या मागण्या वीरप्पनची राजकीय, आर्थिक समज दाखवून देणाऱ्या होत्या. राजकुमार यांचे अपहरण हा वीरप्पनच्या आयुष्यातील सगळ्यात खळबळजनक कृती होती पण तीच त्याच्या शेवटाकडे वाटचाल सुरु करणारी ठरली. राजकुमार तब्ब्ल १०० पेक्षा अधिक दिवस वीरप्पनच्या ताब्यात होते. हे नाट्य संपल्यानंतर राजकुमार यांनी वीरप्पन बद्दल प्रशंसोद्गार काढले होते. हे स्टोकहोम सिंड्रोमचे उदाहरण म्हणता येईल पण वीरप्पनच्या खात्म्यानंतर याच राजकुमार यांनी 'एक दुष्ट प्रवृत्ती नाहीशी झाली अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
या पार्श्वभूमीवर वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाल्टर दवाराम यांनी तामिळनाडू स्पेशल टास्क फोर्सची स्थापना केली. त्यांच्या गाठीशी तामिळनाडूच्या उत्तर भागात आंध्र प्रदेशच्या सीमावर्ती भागात पसरलेल्या नक्षलवादी चळवळीच्या उच्चाटनाचा अनुभव होता. त्यांनी स्थापन केलेल्या टास्क फोर्स मध्ये अनेक अधिकारी, कमांडो होते. कित्येकांनी तर वीरप्पन पकडला अथवा मारला जाईपर्यंत विवाह न करण्याची शपथ घेतली होती. वीरप्पनचा वावर असणाऱ्या भागात खबऱ्यांचं विश्वसनीय जाळं उभारणे, गस्त घालणे, वेळोवेळी चकमकी अशा प्रकारे वर्ष २००० च्या आरंभापर्यंत वीरप्पनची टोळी मोठ्या प्रमाणात मोडकळीला आली होती. तरीही वीरप्पन कायम गुंगारा देण्यात यशस्वी झाला होता. हा जीवघेणा पाठशिवणीचा खेळ अनेक वर्ष चालला. जंगलात वावरताना, अशा हुशार आणि धोकादायक माणसाचा पाठलाग करताना कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, गस्ती मोहीम कशा पद्धतीने आखल्या पाहिजेत याचे अतिशय उपयुक्त धडे या संपूर्ण कारवाईत मिळतात. एक उदाहरण मात्र अवाक करण्यास पुरेसे आहे. स्पेशल टास्क फोर्स वीरप्पन टोळीचा माग काढत घनदाट अरण्यातील एका वस्तीत आली. तिथल्या लोकांनी सांगितलं की गावाजवळच्या एका मोकळ्या भागात त्यांना वेगळ्या रंगाची मानवी विष्ठा दिसली आहे. या गावातील लोक जे प्रमुख अन्न खातात त्यामुळे त्यांच्या विष्ठेचा रंग काळसर असतो. पण ही वेगळी आहे. त्यावरून टास्क फोर्सनी निष्कर्ष काढले आणि ते बरोबर निघाले ते असे की हे लोक मुख्यतः भात खाणारे असावेत. एक-दोन दिवसांपूर्वीच या भागातून निघून गेले असावेत. आणि त्याद्वारे माग काढला असता एका ठिकाणी चकमक झाली पण घनदाट जंगल, अंधार यांचा फायदा घेऊन वीरप्पन गुंगारा देण्यात यशस्वी झाला. या पुस्तकांत वीरप्पनच्या क्रौर्याच्या कथा वाचताना कायम एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे त्याने कायम पोलीस यंत्रणेच्या एक पाऊल पुढे जात विचार करून सापळा रचलेला असायचा.
के. विजय कुमार यांनी २००१ मध्ये स्पेशल टास्क फोर्सचं प्रमुखपद स्वीकारलं. त्याचवेळी वीरप्पनची टोळी क्षीण झाली होती. त्याला माणसांची आणि शस्त्रांची गरज होती. टास्क फोर्सने आपल्यातला एक माणूस शस्त्र व्यूव्हर करणारा दलाल आहे अशी बतावणी करून त्याच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला. पण शेवटच्या क्षणी वीरप्पनला आलेला बारीकसा संशय आणि 'नजीकचा काळ कठीण आहे' असा त्याच्या ज्योतिषाने दिलेला सल्ला यामुळे वीरप्पन सावध झाला आणि योजना बारगळली. पण वीरप्पनला त्याच्या अंताकडे घेऊन जाण्यास कारणीभूत ठरला तो त्याचा डोळ्याचा आजार. त्याचाच वापर करून त्याच्या विरोधात सापळा रचण्यात आला. त्याच्या विश्वासार्ह स्रोतांत आपली माणसे पेरत त्याला पोलिसांनी खास तयार केलेली ऍम्ब्युलन्स देण्यात आली. ठरलेल्या ठिकाणी ती ऍम्ब्युलन्स आली आणि तुफान थरारक गोळीबार नाट्यानंतर या क्रूरकर्म्याचा अंत झाला. त्यानंतर देशभरच्या माध्यमात उलटसुलट चर्चा रंगल्या. एकेकाळी जगात मोस्ट वॉन्टेड लोकांच्या यादीत वीरप्पनला तिसरे स्थान देण्यात आले होते. त्यात सद्दाम, ओसामा नंतर वीरप्पनचा क्रमांक होता. वीरप्पनच्या मृत्यूनंतर मदुमलाई आणि बांदीपूरचा मोठा भाग आता शांत झाला आहे. तिथे आता गोळीबाराचे नाही तर प्राण्या-पक्ष्यांचे आवाज जास्त येतात. जवळ जवळ ११ वर्षं चाललेल्या या पाठलागाची कथा मुळातून वाचण्यासारखी आहे. जंगल आणि कारवाया करणे किती अवघड आहे ते कळण्यासाठी, व्यवस्थाच कशा प्रकारे वीरप्पनसारख्या वृत्ती जन्माला घालते पण त्याच व्यवस्थेच्या अधीन राहून त्यांचा अंतही करता येतो हे कळण्यासाठी हे पुस्तक मुळातून वाचले पाहिजे. के. विजय कुमार पुढे छत्तीसगढ मध्ये नक्षलवाद विरोधी कारवायांसाठी तेथील पोलिसांचे सल्लागार होते. त्याहीपेक्षा महत्वाची अगदी अलीकडची कामगिरी म्हणजे जम्मू आणि काश्मीर राज्यातील राष्ट्रपती राजवट- कलम ३७० चा निर्णय, राज्याचे द्विभाजन करण्याचा निर्णय या सर्व महत्वपूर्ण काळात ते तत्कालीन जम्मू आणि काश्मीर राज्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे सल्लागार होते.
थरारक कथानक, वैशिष्ट्यपूर्ण तपशील यामुळे ही जंगलातील पाठलागाची कहाणी अतिशय वाचनीय झाली आहे. मूळ इंग्रजी तसेच मराठी अनुवाद आवर्जून वाचावा असाच आहे. वीरप्पन: चेंजिंग द ब्रिगंड....
Comments
Post a Comment