दुसऱ्या महायुद्धानंतर जगात फार कमी वेळा अशा आल्या जेव्हा जगभरात एक अनिश्चितता आली होती. मानवजातीचे वर्तमान आणि भविष्य काय असेल यावर प्रश्नचिन्ह निर्माण होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातल्या बहुतेक वेळा युद्धाचे सावट होते किंवा १९७३ सालचे क्रूड ऑइल संकट होते. महागाईचा भडका सर्वत्र उडाला होता. अशा प्रसंगी इतर उत्पादन आणि सेवा ठप्प पडण्याच्या मार्गावर आल्या तरी अत्यावश्यक सेवांची गरज पडतेच. त्यांचे उत्पादन आणि पुरवठा यावर परिणाम झाला तर त्याची परिणती एका अराजकाकडे होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर सध्याचे चीननिर्मित जागतिक संकट आणि त्याचा जागतिक व्यवहारांवर झालेला परिणाम खूप महत्वाचा आहे. चीनमध्ये सुरुवात झालेलं कोरोना व्हायरस किंवा कोविद १९ किंवा अगदीच थेट उल्लेख करायचा तर चायनीज वूहान व्हायरस हे एक प्रचंड मोठे संकट म्हणून उभे ठाकले आहे. भारत सरकार आणि राज्य सरकारे वेळीच सावध झाली. चीनमधून जेव्हा प्राथमिक बातम्या आल्या तेव्हा केंद्र सरकारने वूहान मधून भारतीय विद्यार्थी आणि इतरांना भारतात आणण्याची व्यवस्था केली. या आजाराचा जागतिक प्रसार वाढला आणि भारतातील प्रथम रुग्ण समोर आले तेव्हा आंतरराष्ट्रीय विमानतळांवर 'स्क्रीनिंग' ची व्यवस्था तातडीने उभी करण्यात आली. २२ मार्च पर्यंत भारतीय विमानतळांवरील तपासणी सुविधांवर १५ लाख पेक्षा जास्त प्रवाशांची तपासणी करण्यात आली होती. लष्कर, हवाई दळ, नौदल आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांनी अवघ्या काही दिवसात 'क्वारंटाईन' सुविधा उभ्या केल्या. ही सर्व तयारी एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला या परिस्थितीत अत्यंत गरज होती ती गर्दीपासून दूर राहण्याची, तिथे राज्य सरकारांनी, विशेषतः महाराष्ट्र सरकारने वेळोवेळी आवाहन केले. पण भारतीय जनमानस काही वेगळ्याच मुशीतून तयार झालेले आहे. आम्ही इंग्रजकाळातले दुष्काळ, प्लेग, देवी वगैरेच्या साथीतून जगलो वाचलो आहोत. हा नवीन विषाणू आमचं काय वाकडं करणार आहे? असा एकंदर अविर्भाव सुरुवातीला दिसला. पण १९ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २२ मार्चला 'जनता कर्फ्यू' पाळण्याचे आवाहन केले. या आवाहनाला देशातल्या लोकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. पंतप्रधानांचे आवाहन आणि प्रत्यक्ष जनता कर्फ्यू ही एक प्रकारची पूर्वतयारी आहे हे त्याचवेळी जवळजवळ स्पष्ट होते. त्याचा दुसरा टप्पा म्हणून २४ मार्चला पंतप्रधानांनी २१ दिवस संपूर्ण देशभर 'लॉकडाऊन'ची घोषणा केली. इथेच अत्यावश्यक सेवा आणि भारतीय जनमानस यांचा कस लागणार आहे.
परिस्थिती बिकट आहे. उभा देश एकत्र होऊन या संकटाशी सामना करण्याच्या गोष्टी करत आहे. पण समाजाच्या सर्वात पहिल्या पातळीवर काय अडचणी असतात यांची चर्चा कुठे फारशी केली जात नाही. सध्या गरज आहे ती परस्पर सहकार्याची. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सध्या तरी काही प्रचंड मोठ्या आणि आउट ऑफ बॉक्स उपायांची आवश्यकता नाही. नाकाबंदी आणि गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना योग्य त्या स्पष्ट सूचना देणं आणि त्यांनी त्या पाळाव्यात अशी स्पष्ट सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या तरी पुरेसं आहे. चलन उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय स्टेट बँकेला जिल्हाधिकारी पातळीवरून काही सूचना किंवा निदान सहकार्याचे आवाहन केले तरी परिस्थिती बरीच सोपी होऊ शकणार आहे. एक गोष्ट मान्य करणं आवश्यक आहे ती म्हणजे सर्व सरकारी यंत्रणा आपापल्या पातळीवर योग्य काम करत आहेत. गरज आहे अधिक सहकार्याची.
Wow changle lihles
ReplyDelete