Skip to main content

'सुधाकांत' डॉ. भूपेन हजारिका

'सुधाकांत' डॉ. भूपेन हजारिका 



दिल हुंम हुंम करे , घबराए ..... लताचा आवाज आणि एका वेगळ्याच जगात घेऊन जाणारी चाल. त्या चालीत काहीतरी वेगळे आहे. ह्याप्रकारची चाल, संगीत संयोजन याआधी फारसे कधी ऐकलेले नाही. एक वेगळी अनुभूती आहे. कोठून आली ती? ह्या चालीचा निर्माता कोण? तो आहे आसामचाच नाही तर देशाचा सुपुत्र 'सुधाकांत' भूपेन हजारिका. ब्रम्हपुत्रेच्या खोऱ्यात पसरलेला आसाम भारतीय संस्कृतीचे एक आगळे वेगळे रूप दाखवतो. श्रीमंत शंकरदेवांनी दाखवलेल्या वैष्णव धर्माची पताका आसाम अभिमानाने वागवतो. त्या वैष्णव धर्माचे एक महत्वाचे स्थान म्हणजे माजुली आणि त्या असं पासचे क्षेत्र. त्या क्षेत्रातच आसामच्या ह्या श्रेष्ठ संगीतकार, गायक, गीतकार, कवी, चित्रपटकर्ता, सामाजिक कार्यकर्ता, शिक्षण तज्ञाचा जन्म झाला. आसामचे लोकसंगीत, प्रचलित संगीताचे विविध प्रकार आत्मसात करत, असामी भाषेचा गोडवा, शब्दांची गंमत अंगीकारत पुढे त्याने आसामचे नाव देशभरात पोचवले.

तेझपूर सारख्या गाववजा शहरात त्यांची भेट ज्येष्ठ आसामी कवी, नाटककार आणि पहिले आसामी चित्रपटकर्ते  ज्योती प्रसाद अग्रवाल यांच्याशी झाली. त्याचबरोबर क्रांतिकारी कवी आणि लेखक बिष्णु प्रसाद राभा यांच्या संगतीत काव्य लेखन, लेखन, गायन आणि संगीत दिग्दर्शनाचे धडे त्यांनी गिरवले. तेझपूर येथील विद्यालयातून मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयातून पदवी मिळवली. 1949 साली त्यांना न्यू यॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळाली. कोलंबिया विद्यापीठात त्यांनी ' प्रपोझल्स फॉर प्रिपेरींग इंडियाज बेसिक एज्युकेशन टू युज ऑडिओ-व्हिजुअल टेक्निक इन ऍडल्ट एज्युकेशन' या विषयावर प्रबंध सादर केला. प्रौढ साक्षरतेसाठी दृकश्राव्य माध्यमांचा जास्तीतजास्त उपयोग करण्यासाठी उपाययोजना हा विचार तत्कालीन परिस्थितीत क्रांतिकारी आणि काळाच्या पुढचा ठरणारा आहे. त्यांचा डॉक्टरल थिसीस 'डिमिस्टीफायिंग डॉ. भूपेन हजारिका: एन्व्हिजनिंग एज्युकेशन इन इंडिया' या नावाने छापण्यात आला. कोलंबिया विद्यापीठातून परत आल्यानांतर त्यांनी गौहाटी विद्यापीठात शिकवण्यास सुरुवात केली. गौहाटी विद्यापीठात काही वर्षे शिकवल्यानंतर त्यांनी आपले बस्तान कोलकत्याला हलवले. तिथे त्यांच्या संगीत, चित्रपट कारकिर्दीला बहर आला.  त्या काळात त्यांनी दर्जेदार आसामी चित्रपट केले. त्यातील शकुंतला, प्रतिध्वनी इत्यादी चित्रपटांना विविध पुरस्कार मिळाले.

आसामी लोकसंगीत आणि विविध संगीत प्रकार हाताळत त्यांनी असंख्य गीतांना चाली दिल्या. त्या गायल्या. वयाच्या बाराव्या वर्षी ज्योती प्रसाद अगरवाल यांच्या 1939 साली आलेल्या 'इंद्रमालती' या चित्रपटातील 'बिस्वो बिजाई नौजवान ' आणि 'काखोते कोलोसि लुई ' या गाण्यांपासून त्यांच्या गायन प्रवासाची सुरुवात झाली.  आसामी भाषेतील 'बिस्तीर्नो  परोर , स्नेहे आमार खोतो .. ' ही काही गाणी प्रचंड लोकप्रिय झाली. आसामी भाषेतील संगीत, चित्रपट क्षेत्रातील कारकीर्द सुरु असतानाच 1980 च्या दशकात हजारिका यांची भेट स्त्रीवादी कलाकार, चित्रपटकर्त्या कल्पना लाजमी यांच्याशी झाली. कल्पना लाजमी यांच्या हिंदी चित्रपटांना हजारिका यांनी दिलेले संगीत घराघरात पोचले. पूर्वी विविध उपक्रम, कार्यक्रमांद्वारे त्यांनी आसामी लोकसंगीत देशपातळीवर आणले होते. हिंदी चित्रपटामुळे त्याचे क्षितिज अधिक विस्तारले. कल्पना लाजमी यांच्या एक पल, रुदाली, दामन या चित्रपटातील त्यांचे संगीत गाजले. या चित्रपटातील बहुतेक गाणी मूळ आसामी गीताचा हिंदीत अनुवाद करून घेण्यात आलेली होती. संगीत क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मान मिळाले. 1977 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले. अरुणाचल प्रदेश सरकारने सिनेमा आणि चित्रपट या माध्यमातून आदिवासी विकासासाठी विशेष कार्य केल्याबद्दल सुवर्णपदक देऊन सन्मान केला आहे.1987 साली  संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. पुढे 1998 ते 2003 या काळात ते स्वतः संगीत नाटक अकादमीचे प्रमुख होते. 1993 सालात जपानमधील 'एशिया पॅसिफिक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल'मध्ये रुदाली या सिनेमातील संगीतासाठी त्यांना पुरस्कार मिळाला होता. ह्या प्रतिष्ठेच्या महोत्सवात पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय भारतीय होते. 1992 साली त्यांना 'दादासाहेब फाळके पुरस्कार भारतीय सिनेजगतातील सर्वोच्च सन्मानाने गौरवण्यात आले. 2001 साली पद्मभूषण, 2009 साली आसाम रत्न  आणि 2019 साली मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

आसामच्या ह्या सुपुत्राने तेथील लोकसंगीताचीच नाही तर एकंदर संस्कृतीची ओळख उर्वरित भारताला करून दिली. उत्तर-पूर्व भारताकडे उर्वरित भारताचे होणारे दुर्लक्ष हा आजही कळीचा मुद्दा आहे. ही दरी भरून काढण्यासाठी दोन्ही बाजूनी प्रयत्न होणे गरजेचे आहे. आसामातील लोक आपला भारतीय आत्मा कायमच जपत आलेले आहेत. आता अधिकाधिक पुढाकार उर्वरित भारताने घेण्याची गरज आहे. ही दरी मिटवण्यासाठी सांस्कृतिक आघाडीवर 'सुधाकांत' डॉ. भूपेन हजारिका यांनी प्रचंड मोठे कार्य केले आहे. भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान हा त्या प्रचंड कार्याचा यथोचित सन्मान आहे.

पूर्वप्रसिद्धी: साप्ताहिक 'स्वतंत्र नागरिक'

Comments

Popular posts from this blog

राम मंदिर: राम विचार, राम विधान

उदंड जाहले पाणी  स्नानसंध्या करावया  जप तप अनुष्ठाने, आनंदवनभुवनी।। बुडाली सर्वही पापे हिंदुस्थान बळावले  अभक्तांचा क्षयो झाला, आनंदवनभुवनी।। साक्षेपी लेखक, विचारवंत नरहर कुरुंदकर शिवाजी महाराजांवरील व्याख्यानात म्हणतात, "उदंड जाहले पाणी स्नानसंध्या करावया, हे पाणी उदंड तेव्हाच होते जेव्हा दोन्ही तीरांवर हिंदूंचे राज्य असेल नाही तर तेच पाणी उडी मारून आत्महत्या करण्याच्या योग्य ठरते"  आज अयोध्येत श्रीरामलला विराजमानची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीरामरायाकडे क्षमायाचना केली. आमच्या पुरुषार्थात, एकीत, क्षात्रतेजात काही कमतरता होती म्हणून हे श्रीराममंदीर होण्यास इतका विलंब झाला. पण आता श्रीराम विराजमान झाले आहेत. हा अभूतपूर्व क्षण आहे, आणि श्रीराम नक्कीच आपल्याला क्षमा करतील.  आजचा दिवस हा शरयू-गंगा-भागीरथीचे पाणी उदंड करणारा आहे. नर्मदा, सिंधू, गौतमी, कावेरी, वाशिष्ठी, कृष्णा, ब्रह्मपुत्र, महानदीचे पाणी उदंड करणारा आहे. हा क्षण आपण सर्वानी याची देही याची डोळा अनुभवला! धन्य झालो.   हा अभूतपूर्व क्षण अनुभवत असतानाच अनेक विचार अखंडपणे येत आहेत. काय आहे

अथातो बिंब जिज्ञासा

अथातो ब्रह्म जिज्ञासा, असे म्हणत ऋषीमुनींनी या विश्वाचे रहस्य जाणून घेण्यासाठी गहन चर्चा केल्या. त्याचे रूपांतर वेद-उपनिषद, पुराणे यात झाले. त्यासोबतच एक प्रगल्भ समाज उभा राहिला, त्यांच्या पूजा पद्धती, उपासना पद्धती विकसित होत गेल्या. त्या क्रमाने विकसित होत निसर्ग-नैसर्गिक शक्तींची पूजा, यज्ञाद्वारे आहुती देणे ते प्रतीक निर्माण ते प्रतिमा निर्मिती इथवर पोचल्या. श्रेष्ठ मूर्तिविज्ञान साधक, संशोधक डॉ. गोरक्षनाथ तथा गो. ब. देगलूरकर, मांडतात, "ऋग्वेदात श्री विष्णूच्या संबंधी सहा ऋचा आहेत, त्या एका अर्थी विष्णूच्या 'शाब्दिक प्रतिमाच' आहेत. या शाब्दिक प्रतिमेचे प्रत्यक्ष प्रतिमेत रुपांतर करण्यासाठी पाषाण वापरले गेले. ते मग एका कुंपणाने बंदिस्त केले गेले. त्याला 'नारायण वाटक' म्हणू लागले" मूर्ती घडवणे, त्यांचे उपासना, पूजा यातील वाढते महत्त्व, त्यांचे अर्थ हा विषय गहन आहे तरीही उद्बोधक आहे. हाच देगलूरकर यांचा ध्यास आहे. तो आजवर अनेक पुस्तकांमधून समोर आला आहेच, त्यात 'अथातो बिंब जिज्ञासा' या टागोर फेलोशिप साठी लिहिलेल्या थिसीसची भर पडली आहे. तोच थिसीस मूर्ती,

वार्षिक अर्थसंकल्प: Part 1

  अर्थमंत्री २०२३-२४ साठीचा अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी.  १ फेब्रुवारी जवळ येऊ लागतो तसे आता अर्थसंकल्पाचे वेध लागतात . पूर्वी ते २८ फेब्रुवारी येतायेता लागत असत . नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने हा प्रघात बदलून १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केली . ती का केली , त्याचे काय परिणाम इत्यादी विषय अनेक वेळा चर्चेला येऊन गेले आहेत . गेल्या ५ हुन अधिक वर्षांत त्याचे लाभही दिसून आले आहेत . तरीही उजळणी स्वरूपात चर्चा केली जाणार आहे . अर्थसंकल्प येण्यापूर्वी या देशाचा अर्थसंकल्प या संकल्पनेवर आधारित विविध घटकांची चर्चा करण्याचा इथे प्रयत्न आहे . प्रक्रिया समजावून सांगण्याचा प्रयत्न आहे . घटनात्मक तरतुदी दर वर्षी फेब्रुवारी महिन्यात समस्त भारत अर्थसंकल्पाकडे डोळे लावून बसलेला असतो . अर्थसंकल्पात काय मांडणी आहे यावर देश वर्षभरात कसा वाटचाल करणार आहे हे निश्चित होत असते , तसेच गेल्या वर्षभराचा आढावा देखील त्यात असतो . भारतीय संविधानाच्या भाग ५ मध्ये केंद्र सरकार , सं