लोकसभा निवडणुकीचा ट्रिगरपॉइंट
2019 च्या निवडणुका पाच महिन्यात होऊ घातल्या आहेत. लोकसभा निवडणुकांची उपांत्य फेरी समजल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. त्यातील तीन राज्यांत भाजपची पीछेहाट झाली. तेलंगणात चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीने प्रमुख प्रतिस्पर्धी काँग्रेस आणि टीडीपी यांच्या महाकुटुमी (महाआघाडी) चा मोठा पराभव केला. छत्तीसगढ़ राज्यात काँग्रेसने निर्विवाद बहुमत मिळवले तर मध्य प्रदेश आणि राजस्थान राज्यांत काँग्रेस-भाजपने तुल्यबळ जागा पटकावल्या आहेत. तरीही सत्तांतर होऊन काँग्रेसने सरकार स्थापन केले आहेत. देशात भाजप-एनडीए विरुद्ध महाआघाडी, तिसरी आघाडी वगैरे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राफेल प्रकरण, शेतकरी कर्जमाफी वगैरे प्रकरणावरून माध्यमांद्वारे वातावरण तापवले जात आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला प्रदीर्घ मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत विविध मुद्दे चर्चीले गेले असले तरी संपूर्ण मुलाखतीचा रोख राजकीयच होता.
2018 हे वर्ष भाजपसाठी कसे ठरले? असा थेट प्रश्न सुरुवातीलाच आला. त्याला उत्तर देताना मोदींनी संमिश्र उत्तर दिले. हरयाणा, त्रिपुरा, आसाम वगैरे राज्यांतील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमधील यश यांचा दाखला दिला. विधानसभा निवडणुकांचा विषय येता स्पष्ट केले की तेलंगण आणि मिझोरम राज्यांत भाजप पक्षाची ताकद सरकार स्थापन करू शकेल किंवा तसा दावा करू शकेल इतकी नव्हतीच. छत्तीसगढ़ मध्ये काँग्रेस पक्षाला निर्विवाद बहुमत मिळाले पण मध्य प्रदेश आणि राजस्थान राज्यांत मात्र त्रिशंकु विधानसभा आहेत. निवडणुका त्यांचे निकाल यांवर भाष्य करत असताना आयुष्मान भारत, संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केलेला 'चैम्पियन ऑफ़ द अर्थ' पुरस्कार, वीजजोडणी, खेळ क्षेत्रातील भारतीयांची कामगिरी, बंपर कृषी उत्पादन इत्यादी मुद्द्यांना देखील स्पर्श केला. पुढील प्रश्न आला तो त्या राज्यांतील निवडणुकांत भाजप आपल्याला मिळालेल्या टक्केवारीचे रूपांतर जागांमध्ये करू शकला नाही. स्वतः मोदींनी सभा घेऊनही जागा वाढल्या नाहीत, तर याचा अर्थ मोदी लाट आता विरली आहे असा विरोधक, विश्लेषक अर्थ काढत आहेत तो कितपत मान्य आहे असा. यावर उत्तर म्हणून, मुळात अशी कुठली लाट होती हे विरोधक, विश्लेषक मान्य करतात हीच मोठी गोष्ट आहे अशी टिप्पणी मोदींनी केली. पुढे जात 2013-14 सालातील माध्यमांतील बातम्यांचा दाखला दिला. त्या काळातदेखील मोदी लाट अशी कुठली गोष्ट नसल्याचे ठासून सांगितले जात होते. जर कुठली लाट असेलच तर जनतेच्या आशा आकाक्षाची पुर्तता करू शकण्याची लाट आहे असे मोदी म्हणाले. महागठबंधन, तिसरी आघाडी यांबद्दल चर्चा सुरू असता मोदी म्हणाले की पुढील निवडणूक ही जनता विरुद्ध महागठबंधन अशी असणार आहे. गठबंधन एकत्र बांधण्यासाठी मोदी लाट ओसरली, भाजपला 180 पेक्षा कमी जागा मिळतील अशा वावड्या उठवल्या जात आहेत. मागील लोकसभा निवडणूक आणि त्यानंतरही 'काँग्रेसमुक्त भारत' ही संज्ञा वापरण्यात आली. पण आता काँग्रेस पुन्हा एकदा राज्यांत सत्तेत येत आहे. तर पर्याय म्हणून लोक काँग्रेस कड़े बघत आहे मग काँग्रेसमुक्त भारतचे काय ह्या प्रश्नाचे उत्तर देताना, देशाला काँग्रेस संस्कृतीपासून मुक्ती देणे गरजेचे आहे. स्वतः काँग्रेस पक्षानेदेखील काँग्रेस संस्कृतीपासून दूर जाण्याची गरज आहे. लोकशाहीत प्रबळ विरोधी पक्ष असणे आवश्यक आहे पण काँग्रेस ती भूमिका वठवण्यात अपयशी ठरला आहे.
मोदी सरकारने घेतलेला महत्वपूर्ण निर्णय म्हणजे निश्चलनीकरण किंवा नोटबदलीचा. या निर्णयामुळे लहान व्यापारी, उद्योजक, बांधकाम क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. अर्थव्यवस्था वाढीचा दर पुन्हा सावरला असला तरी या निर्णयाचा मोठा परिणाम झाला आहे. हा निर्णय गरजेचा होता का असा प्रश्न आला त्यावर उत्तर देताना मोदी म्हणाले की देशात मोठ्या प्रमाणातील समांतर अर्थव्यवस्थेचे अस्तित्व घातक होते. चलनी नोटांचा पुरवठा याच प्रमाणात होत राहिला असता तर अर्थव्यवस्था अधिक संकटात सापडली असती. आणि हा निर्णय काही अचानक आलेला नाही. आपल्याकडील काळे धन उघड करून दंड भरुन नियमीत करण्याची संधी दिली होती. पण हे सरकार त्यापुढे जात अशा प्रकारचा निर्णय घेईल अशी कोणी अपेक्षा केली नव्हती. जिथे प्रश्न जीएसटीचा येतो तर तो निर्णय काही फ़क्त भाजपचा नाही. प्रणब मुखर्जी अर्थमंत्री असताना या प्रक्रियेची सुरुवात झाली होती. संसदेत सर्व पक्षांनी मिळून जीएसटीला मान्यता दिली आहे. त्यात काही त्रुटी असतील तर त्या सुधारण्याचे काम जीएसटी परिषद सतत करत आहे. त्यात राज्यांचे प्रतिनिधी आहेत. जीएसटीला विरोध करून विरोधक आपल्याच पक्षाच्या राज्यसरकारातील व्यक्तींचा अपमान करत आहेत. नोटबंदीचा निर्णय आणि अनेक महत्वपूर्ण कायदे यांमुळे गैरव्यवहार करणारे अनेक लोक देशाबाहेर पळुन जात आहेत. त्यांच्यावर देखील योग्य त्या सर्व मार्गानी कारवाई केली जात आहे.
राफेल खरेदी आणि त्याभोवती केले जाणारे राजकारण हा सध्याचा सर्वात ज्वलंत मुद्दा. विरोधकांचे आरोप आणि माध्यमांतून मिळणारी प्रसिद्धी यामुळे देशाच्या सुरक्षेशी खेळ केला जात आहे. आपल्या लष्करी जवानांचा जीव केवळ नशिबाच्या हवाल्यावर सोडण्यास आपण तयार नाही. कितीही टीका झाली, आरोप झाले तरी सुरक्षा दलांच्या सक्षमतेसाठी काम करतच राहणार असा ठाम पवित्रा मोदींनी घेतला. सर्जिकल स्ट्राइक हा मुद्दादेखील राजकीय क्षेत्रात खूप चर्चिला गेला. त्या गोष्टीचे राजकीय भांडवल करणे योग्य नाही असे स्पष्ट प्रतिपादन पंतप्रधानांनी केले. पण विरोधकांनी लष्कराच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पाकिस्तानमध्ये जी भाषा वापरली गेली तशीच भाषा त्यांच्याकडून वापरली गेली जे चुकीचे होते. सर्जिकल स्ट्राइकनंतरही घूसखोरी सुरू आहे. पण एक गोष्ट नक्की की पाकिस्तान हा काही एका तडाख्याने शांत बसणारा नाही. नाहीतर 1965 नंतर लगेच 1971 साली युद्ध झालेच नसते. पण पाकिस्तानशी चर्चा हे भारताचे अधिकृत धोरण राहिलेले आहे.
कृषी कर्जमाफी आणि एकंदरच कृषीक्षेत्राच्या विकासासाठी विद्यमान सरकारने काय पावले उचलली आहेत याचा वृत्तांत मोदींनी दिला. अन्नप्रक्रिया उद्योग, पायाभूत सुविधा, कोल्ड स्टोरेज, सॉइल हेल्थ कार्ड, सिंचन इत्यादी क्षेत्रात भरीव काम होत आहे. शेतकऱ्याला कर्ज घेण्याची गरज पडू नये अशा प्रकारचे सबलीकरण करण्याची आवश्यकता आहे. कर्जमाफ़ी हा योग्य आणि अंतिम उपाय नाही तरीही राज्य सरकारांनी ती दिली तर त्यांना अडवले नसल्याचे प्रतिपादन मोदींनी केले. मध्यमवर्ग, जो भाजपचा प्रमुख मतदार मानला जातो त्यांच्यासाठी केलेल्या कामांची जंत्री सादर केली गेली. महागाई नियंत्रण, उड़ान योजना इत्यादी.
पंतप्रधान मोदींनी ही मुलाखत भारतातील मुख्य प्रवाहातील माध्यमाला दिलेली नाही. एएनआय नावाच्या वृत्तसंस्थेला दिली. ह्या पाच वर्षात मोदी यांनी दिलेली ही केवळ दूसरी मुलाखत होती. मोदी यांनी या संपूर्ण काळात एकही पत्रकार परिषद घेतली नाही. संवाद साधला तो 'मन की बात' या कार्यक्रमातून अशी टीका केली जात होती. ह्या मुलाखतीतही मोदी सतत 'एका विशिष्ट' गटाचा उल्लेख सतत करतात. हा विशिष्ट गट म्हणजे माध्यमे, बुद्धिजीवी वर्तुळ असणारा जो 'ल्यूटन्स दिल्ली' वाला गट म्हणून ओळखला जातो. या प्रस्थापित माध्यमे, बुद्धिजीवी लोकांनी मोदींवर व्यक्तिशः किंवा सरकारवर कायम टीकाच केली आहे. या सर्वाला काही माध्यमे अपवाद आहेत तरीही मोदींनी या सर्व वर्तुळाला बाजुला ठेवले आहे. मोदींनी ल्युटन्स वर्तुळात शिरकाव करण्याचा प्रयत्न कधी केला नाही. असे असले तरी इथून पुढे लोकसभा निवडणुका होईपर्यंत सर्व राजकारण मोदी ही व्यक्ती, भाजप हा पक्ष यांभोवती फिरत राहणार आहे. ही मुलाखत त्याचीच सुरुवात असणार आहे.
पूर्वप्रसिद्धी: साप्ताहिक 'स्वतंत्र नागरिक'
Comments
Post a Comment