Skip to main content

राम मंदिर: राम विचार, राम विधान


उदंड जाहले पाणी 
स्नानसंध्या करावया 
जप तप अनुष्ठाने, आनंदवनभुवनी।।

बुडाली सर्वही पापे
हिंदुस्थान बळावले 
अभक्तांचा क्षयो झाला, आनंदवनभुवनी।।

साक्षेपी लेखक, विचारवंत नरहर कुरुंदकर शिवाजी महाराजांवरील व्याख्यानात म्हणतात, "उदंड जाहले पाणी स्नानसंध्या करावया, हे पाणी उदंड तेव्हाच होते जेव्हा दोन्ही तीरांवर हिंदूंचे राज्य असेल नाही तर तेच पाणी उडी मारून आत्महत्या करण्याच्या योग्य ठरते" 

आज अयोध्येत श्रीरामलला विराजमानची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीरामरायाकडे क्षमायाचना केली. आमच्या पुरुषार्थात, एकीत, क्षात्रतेजात काही कमतरता होती म्हणून हे श्रीराममंदीर होण्यास इतका विलंब झाला. पण आता श्रीराम विराजमान झाले आहेत. हा अभूतपूर्व क्षण आहे, आणि श्रीराम नक्कीच आपल्याला क्षमा करतील. 

आजचा दिवस हा शरयू-गंगा-भागीरथीचे पाणी उदंड करणारा आहे. नर्मदा, सिंधू, गौतमी, कावेरी, वाशिष्ठी, कृष्णा, ब्रह्मपुत्र, महानदीचे पाणी उदंड करणारा आहे. हा क्षण आपण सर्वानी याची देही याची डोळा अनुभवला! धन्य झालो.  

हा अभूतपूर्व क्षण अनुभवत असतानाच अनेक विचार अखंडपणे येत आहेत. काय आहे ही भारतीय संस्कृती, भारतीय परंपरा! इतके जीवघेणे आघात झाले, अजूनही होत आहेत, होत राहणार आहेत तरीही आपण टिकून कसे राहिलो? भारतात राजकीय विविधता कायमच राहिली आहे. ठिकठिकाणची पारंपरिक विविधता राहिली आहे. सामाजिक विविधता ही विषमतेच्या पातळीवरची राहिली आहे. हीच विषमता बाह्य आक्रमणांना आमंत्रण देणारी, विनाश ओढवून घेणारी ठरली आहे. तरीही टिकून राहिलो कसे? 

ही संस्कृती नित्य नूतन इति सनातन आहे. ती काळाबरोबर प्रवाही राहते. नव्या प्रवाहांनुसार बदल करते. बदल अंगिकारते. परंपरेचा गाभा तोच राखून आधुनिकतेशी सांधा जोडते...  आणि क्षात्रतेज कायम राखते!

उत्तरेत राजा दाहीर, जयपाळ, अनंगपाळ प्राणांतिक लढे देत असताना मध्य भारत निराळे मापदंड प्रस्थापित करत होता. जयपाळ-अनंगपाळ यांच्या मदतीला ललितादित्याचे साम्राज्य धावून जात होते. विविधता असली तरी एक साह्चार्याची आणि सांस्कृतिक एकतेची भावना होतीच. इस्लामी आक्रमणाच्या रेट्यापुढे भारताचे क्षात्रतेज काहीसे क्षीण झाले असे वाटेपर्यंत बाप्पा रावळ, चाहमान, चालुक्य, राष्ट्रकूट, सेन, परमार अशी शक्ती उभी राहते. उत्तरेत लढे सुरु असताना दक्षिण भारत अद्वैत, द्वैत, विशिष्टाद्वैत यांची परंपरा कायम करत होता. 

उत्तरेतले क्षात्रतेज काहीसे क्षीण झाले असे वाटत असताना त्याला क्षत्रिय आणि धार्मिक पुनरुत्थान दक्षिणेकडूनच सातत्याने मिळत गेले. यादव, कदंब, काकतीय, होयसाळ, पांड्य, चेर, पल्लव असे करत ही परंपरा विजयनगर पर्यंत चालत आली. क्षात्रतेज कायम राखत एक सातत्यपूर्ण लढा दक्षिण आणि पूर्वेच्या राज्यांनी दिला. ओडिशाचे गजपती, आसामचे आहोम यांनी जगन्नाथाच्या आशीर्वादाने आणि आसामने श्रीमंत संकरदेवांच्या धार्मिक पाठिंब्याने केले.  

विजयनगरच्या पतनानांतर एक काळरात्र येऊ पाहत होती, पण एक शतसूर्य सह्याद्रीच्या भूमीत उगवला ज्याने भारतभूमी उषःकालाकडे नेली. शिवाजीराजा छत्रपती होणे ही भारतभूमीतली गंगा-सिंधू-सरस्वती मुक्त करणारी घोषणा होती. त्याचीच प्रेरणा सातत्याने तेवती आहे, जी राम मंदिर प्राण प्रतिष्ठेतून काही अंशी पूर्ण होत, एक पायरी चढली आहे. 

राम मंदिर ही एका आधुनिक क्षात्रतेजाची प्राण प्रतिष्ठा आहे. ती अमृत काळाची प्रेरणा आहे. ती राम नीती, राम नेती, राम विचार, राम विधानाची प्रेरणा आहे. ती वृद्धिंगत करत नेली तरच 

स्वर्गीची लोटली जेथे 
रामगंगा महानदी 
तीर्थासी तुळणा नाही, आनंदवनभुवनी।

जय श्री राम!




Comments

Popular posts from this blog

अथातो बिंब जिज्ञासा

अथातो ब्रह्म जिज्ञासा, असे म्हणत ऋषीमुनींनी या विश्वाचे रहस्य जाणून घेण्यासाठी गहन चर्चा केल्या. त्याचे रूपांतर वेद-उपनिषद, पुराणे यात झाले. त्यासोबतच एक प्रगल्भ समाज उभा राहिला, त्यांच्या पूजा पद्धती, उपासना पद्धती विकसित होत गेल्या. त्या क्रमाने विकसित होत निसर्ग-नैसर्गिक शक्तींची पूजा, यज्ञाद्वारे आहुती देणे ते प्रतीक निर्माण ते प्रतिमा निर्मिती इथवर पोचल्या. श्रेष्ठ मूर्तिविज्ञान साधक, संशोधक डॉ. गोरक्षनाथ तथा गो. ब. देगलूरकर, मांडतात, "ऋग्वेदात श्री विष्णूच्या संबंधी सहा ऋचा आहेत, त्या एका अर्थी विष्णूच्या 'शाब्दिक प्रतिमाच' आहेत. या शाब्दिक प्रतिमेचे प्रत्यक्ष प्रतिमेत रुपांतर करण्यासाठी पाषाण वापरले गेले. ते मग एका कुंपणाने बंदिस्त केले गेले. त्याला 'नारायण वाटक' म्हणू लागले" मूर्ती घडवणे, त्यांचे उपासना, पूजा यातील वाढते महत्त्व, त्यांचे अर्थ हा विषय गहन आहे तरीही उद्बोधक आहे. हाच देगलूरकर यांचा ध्यास आहे. तो आजवर अनेक पुस्तकांमधून समोर आला आहेच, त्यात 'अथातो बिंब जिज्ञासा' या टागोर फेलोशिप साठी लिहिलेल्या थिसीसची भर पडली आहे. तोच थिसीस मूर्ती,...

स्वातंत्र्यवीर सावरकरांची ईश्वरविषयक विचारप्रणाली

                                                'ईश्वर.' जगात जेवढे काही धर्म, जाती, पंथ, समुदाय इ. आहेत ते सगळे कुठल्यातरी ईश्वर नावाच्या अज्ञात शक्तीवर श्रद्धा ठेवून एकत्र आलेले असतात, स्थापन झालेले असतात. प्रत्येक धर्माच्या, जातीच्या ईश्वराबाद्द्लच्या, धार्मिक मान्यताविषयीच्या संकल्पना वेगळ्या असल्या तरी ते श्रद्धेवरच स्थापन झालेले असतात. कित्येक धर्माच्या संस्थापकांनी, तत्वज्ञांनी ईश्वराबद्दल लिहून ठेवलं आहे. हिंदुस्थानात ७००० वर्षांपासून अस्तित्वात असलेला धर्म-संस्कृती म्हणजे 'हिंदू'.  हिंदू धर्माला कोणताही संस्थापक नाही, धर्मग्रंथ नाही, पण हा धर्म वैदिक आर्यांच्या 'वेद' आणि 'उपनिषदे' यांवर आधारलेला आहे. मुळ 'यज्ञ' संकल्पनेनं ईश्वराचं अस्तित्व मानणाऱ्या हिंदू धर्मात कर्मकांडरुपी  थोतान्डावर  भाष्य केलं. ईश्वराच्या अस्तित्वालाच आव्हान देणारे कित्येक तत्वज्ञ होते पण मूळ वेदांचा सखोल अभ्यास करून हिंदू धर्मातील ईश्वराच्या अस्...

डॉ. आंबेडकरांचे आर्थिक चिंतन आणि वर्तमानातील प्रासंगिकता

एक प्रसिद्ध वचन आहे, "some are born great, some achieve greatness and some are those the greatness is thrust on them.." म्हणजे, काही जन्मतःच महान असतात. तर काही आपल्या कार्यातून, कृतीतून महत्पदाला पोचतात. तर काहींवर महानता लादली, थोपली गेलेली असते. प्रस्तुत विषयाला अनुसरून या वचनातला तिसरा भाग अप्रस्तुत आहे. माणूस जन्मतःच महान असतो का? ती जन्मजात महानता त्या माणसाच्या पुढील आयुष्यातील महत्कार्यामुळे सिद्ध होते. थोर, साक्षेपी विचारवंत कुरुंदकर मांडतात त्याप्रमाणे शिवाजी महाराज हे जन्मतःच महान होते असे आपण म्हणतो कारण महाराजांचे संपूर्ण महत्कार्य आपल्या समोर आहे म्हणून. याच न्यायाने भारतीय सामाजिक, राजकीय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक क्षेत्रात आपल्या कृतीतून, कार्यातून महत्पदाला पोचलेले महामानव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्या महामानवाचे महत्कार्य आपल्या समोर आहे, म्हणून आपण अभिमानाने म्हणून शकतो की ते जन्मताच महान होते.  भारतीय समाजमन माणसांना चौकटीत बसवण्यास उत्सुक असते. एकाच झापडबंद दृष्टीने व्यक्ती आणि कार्याकडे बघण्याचा प्रयत्न करते. पण याच भारताची दुसरी ...