Skip to main content

आर्थिक गुन्हेगारीचे अंतरंग: अपूर्वा जोशी



फॉरेन्सिक, हा शब्द ऐकल्यानंतर डोळ्यासमोर एसीपी प्रद्युमन यांच्या सीआयडी ब्युरोतील डॉ. साळुंखे येतात. चित्रविचित्र रंगांची रसायने, बर्नर, वगैरे येत असत. कारण एक पिढी तो कार्यक्रम पाहत मोठी झाली आहे. पुढली पिढी थोडा अधिक वास्तववादी वाटावा असा क्राईम पेट्रोल हा कार्यक्रम पाहत मोठी होत आहे. त्यात बोटांचे ठसे, रक्ताचे डाग वगैरे शोधणारी अगदी सामान्य दिसणारी माणसे आहेत. पण फॉरेन्सिक म्हणजे भारतीय दंड संहितेतील खून, दरोडा, सदोष मनुष्यवध वगैरेच समोर येते. या रूढार्थाने प्रसिद्ध गुन्ह्यांच्या जोडीला आर्थिक आणि आता सायबर गुन्हे देखील मोठ्या प्रमाणात समोर येऊ लागले आहेत. मग या आर्थिक गुन्ह्यांचा तपास कसा केला जातो? तिथे कोणत्या प्रकारचं तंत्रज्ञान, प्रणाली वापरली जाते? त्याचे नाव फॉरेन्सिक अकाउंटिंग! 

वर्ष २००९ मध्ये गाजलेल्या सत्यम कॉम्प्युटर्स च्या घोटाळ्यात देशात प्रथमच या ज्ञान शाखेचा उपयोग केला गेला. तो घोटाळा नेमका काय आहे, गफलत नेमकी कुठे आहे हे शोधून काढण्यात पुण्यातील फॉरेन्सिक अकाउंटिंग एक्स्पर्ट श्री मयूर जोशी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्याचीच चित्तथरारक कथा, मयूर जोशी यांची सहकारी, त्याच ज्ञान शाखेतील सर्वात तरुण तज्ज्ञ अपूर्वा जोशी यांनी 'आर्थिक गुन्हेगारीचे अंतरंग' या पुस्तकात मांडली आहे. 

Apurva Joshi 

अपूर्वा जोशी हे नाव आता महाराष्ट्रात, देशात परिचित झाले आहे. फॉरेन्सिक अकाउंटिंग क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून त्यांनी अनेक ठिकाणी व्याख्याने, मुलाखती दिल्या आहेत. त्याद्वारे आर्थिक गुन्हेगारीबद्दल त्या जनजागृती देखील करत असतात. त्यांनी या क्षेत्रात नव्याने येऊ पाहणाऱ्यासांठी 'स्टुडंट्स हँडबुक ऑन फॉरेन्सिक अकाउंटिंग' हे पुस्तक देखील लिहिले आहे. त्या रिस्कप्रो मॅनेजमेंट कन्सल्टिंग या कंपनीत टेक्नॉलॉजी अँड ड्यू डिलिजन्स या विभागाच्या प्रमुख आहेत.

आर्थिक गुन्हेगारीचे अंतरंग, या पुस्तकात मुख्य कथा जरी सत्यम घोटाळा आणि त्याचा फॉरेन्सिक अकाउंटिंग मधून केलेला उलगडा ही असली तरी अपूर्वा जोशी यांनी इतिहासात देखील उत्तम मुशाफिरी केली आहे. त्यात स्वातंत्र्यपूर्व काळातील आद्य शेअर मार्केट घोटाळा म्हणता येईल अशा शेठ प्रेमचंद रायचंद प्रकरण ते नुकतेच घडलेले हिंडेनबर्ग रिपोर्ट- अदानी प्रकरण यांचा धांडोळा घेतला आहे. महाराष्ट्रात दाभोळ येथील ऊर्जा प्रकल्प, राज्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू बनलेल्या एन्रॉन कंपनीच्या अफ़रातफ़रीचा देखील विचार त्यांनी केला आहे. प्रेमचंद रायचंद हे पुढल्या काळातील मुंद्रा, दालमिया, हर्षद मेहता, केतन पारेख, रामलिंग राजू (सत्यम फेम) दीपक कोचर-चंदा कोचर, नीरव मोदी-मेहुल चोक्सी अशा घोटाळेबाजांचे परात्पर गुरु ठरतात हेच त्यांच्या सुरस आणि चमत्कारिक कथा वाचून व्यतीत होते. 

Mayur Joshi 

जमिनींचा हव्यास आणि त्यासाठी लेखा मांडणीत केलेली चलाखी आणि ते अंगाशी आल्यावर स्वतःहून पत्र लिहून सत्यमच्या रामलिग राजूने घोटाळ्याची कबुली दिली. पोलिसांच्या स्वाधीन झाले. कायदेशीर प्रक्रियेला सामोरे गेले. पण सगळेच घोटाळेबाज असे नसतात. भारतातील अनेक घोटाळेबाज आज ज्यांना टॅक्स हेवन म्हणतात अशा देशात आहेत. त्यांना भारतात कायद्यापुढे आणण्याचे सर्व प्रयत्न सुरु आहेत. 

फॉरेन्सिक अकाउंटिंग ही ज्ञानशाखा अमेरिकेत मोठ्या प्रमाणात उपयोगात आहे. त्या शाखेत वापरले जाणारे बहुतेक ठोकताळे, नियम हे तिकडूनच आले आहेत. पण भारतीय कायदे, लेखा मांडणी आणि परीक्षणाचे नियम  निराळे आहेत. अमेरिकी ठोकताळे आणि नियम भारतात तसेच्या तसे लागू पडत नाहीत. त्यासाठी मयूर जोशी यांनी आपल्या प्रचंड अभ्यासातून आपले ठोकताळे, आपले नियम तयार केले आहेत. आणि हे करत असताना त्यांना भारतातला आद्य फॉरेन्सिक अकाउंटिंग तज्ज्ञ सापडला. तो आर्य चाणक्य!

चाणक्याने राज्यशकट हाकण्यासाठी अर्थशास्त्र हा एक आदर्श तरीही अतिशय वास्तववादी, व्यवहार्य ग्रंथ लिहिला. या ग्रंथात आपण आपल्या आधीच्या ३३ अर्थशास्त्रींची मांडणी विचारात घेऊन, त्यात आपली भर घालत हा ग्रंथ सिद्ध करतो आहोत हे चाणक्याने स्पष्ट केले आहे. चाणक्याने लेखा मांडणी आणि परीक्षणाच्या दृष्टीने ४० संभाव्य घटना सांगितल्या आहेत. भ्रष्टाचार, घोटाळे टाळण्यासाठी त्या टाळल्या पाहिजेत असे स्पष्ट केले आहे. त्यात उत्पन्न प्रत्यक्ष आलेले नसताना ते आले आहे असे नमूद करणे, उत्पन्न आधी जमा होते जे हिशेब वह्यांत नंतर लिहिले जाते, एक गोष्ट केली जाते पण दुसरीच दाखवली जाते, अर्धवट काम करून ते पूर्ण झाल्याचे लिहिले जाते, अतिरिक्त काम करून घेऊन प्रत्यक्षात अर्धवटच दाखवले जाते, जी रक्कम भरायची आहे ती कधी भरलीच जात नाही, अशा अनेक घटना चाणक्याने लिहून ठेवल्या आहेत. या पुस्तकात किंवा एकुणातच आर्थिक गुन्हेगारीच्या क्षेत्रात, घोटाळे हे याच ४० घटनांच्या भोवताली झालेले आढळतात. यातून भारतीय विचाराचे द्रष्टेपणच दिसून येते. 

भारतीय अर्थव्यवस्था जसजशी अधिकाधिक वाढत जाईल तसतशी कंपन्यांची संख्या, उद्योग क्षेत्रे वाढत जातील. त्याचबरोबर आर्थिक गुन्हेगारीही वाढत जाणार हे सत्य मान्य केले पाहिजे. ते रोखण्यासाठी, झाले तर त्यांचे नीट विश्लेषण करण्यासाठी फॉरेन्सिक अकाउंटिंग ही ज्ञानशाखा अधिकाधिक विस्तारतच जाणार आहे. याचबरोबर एक गोष्ट नमूद केली पाहिजे ती अशी की, भारतात घडलेल्या प्रत्येक मोठ्या आर्थिक घोटाळ्यानंतर सरकार अधिक जागृत झाले आणि नव्या यंत्रणा उभ्या राहिल्या किंवा असलेल्या अधिक सक्षम केल्या गेल्या. मुंद्रा इत्यादी घोटाळ्यानंतर विमा क्षेत्राचे राष्ट्रीयीकरण करत जीवन बिमा निगम उभी राहिली. हर्षद मेहता प्रकरणानंतर सेबी अधिक सक्षम करण्यात आली. केतन पारेख प्रकरणानंतर शेअर्स डिमॅट स्वरुपात आणायची प्रक्रिया जलद झाली. दालमिया, सत्यम प्रकरणानंतर कंपनी कायद्यात अनेक सुधारणा झाल्या. ही यादी खूप मोठी आहे. यापुढे सुधारणा होण्यासाठी असा कोणताही घोटाळा होण्याची वाट बघू नये. असो.

अर्थव्यवस्था हा विषय मुळातच अनेकांना अवघड वाटणारा आहे. त्यात आपल्यासारख्या अर्थसाक्षरता कमी असलेल्या देशात तर परिस्थिती अधिकच बिकट आहे. पण अपूर्वा जोशी यांचे हे पुस्तक आर्थिक गुन्हेगारीचे अंतरंग अगदी सामान्य माणसाला देखील पटकन समजतील असे आहे. सोप्या भाषेत क्लिष्ट विषय यशस्वीपणे मांडण्याबद्दल अपूर्वा जोशी यांचे अभिनंदन. हे पुस्तक प्रत्येकाने वाचलेच पाहिजे. नव्या ज्ञानशाखेची ओळख करुन घेण्यासाठी. चित्तथरारक कादंबऱ्या वाटाव्या अशा सत्यकथा समजून घेण्यासाठी, हे आर्थिक गुन्हेगारीचे अंतरंग वाचलेच पाहिजे. 

पुस्तक: आर्थिक गुन्हेगारीचे अंतरंग- हर्षद ते हिंडेनबर्ग 

लेखिका: अपूर्वा प्रदीप जोशी 

प्रकाशक: राजहंस प्रकाशन  

पूर्वप्रसिद्धी: मुंबई तरुण भारत 


Comments

Popular posts from this blog

डॉ. आंबेडकरांचे आर्थिक चिंतन आणि वर्तमानातील प्रासंगिकता

एक प्रसिद्ध वचन आहे, "some are born great, some achieve greatness and some are those the greatness is thrust on them.." म्हणजे, काही जन्मतःच महान असतात. तर काही आपल्या कार्यातून, कृतीतून महत्पदाला पोचतात. तर काहींवर महानता लादली, थोपली गेलेली असते. प्रस्तुत विषयाला अनुसरून या वचनातला तिसरा भाग अप्रस्तुत आहे. माणूस जन्मतःच महान असतो का? ती जन्मजात महानता त्या माणसाच्या पुढील आयुष्यातील महत्कार्यामुळे सिद्ध होते. थोर, साक्षेपी विचारवंत कुरुंदकर मांडतात त्याप्रमाणे शिवाजी महाराज हे जन्मतःच महान होते असे आपण म्हणतो कारण महाराजांचे संपूर्ण महत्कार्य आपल्या समोर आहे म्हणून. याच न्यायाने भारतीय सामाजिक, राजकीय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक क्षेत्रात आपल्या कृतीतून, कार्यातून महत्पदाला पोचलेले महामानव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्या महामानवाचे महत्कार्य आपल्या समोर आहे, म्हणून आपण अभिमानाने म्हणून शकतो की ते जन्मताच महान होते.  भारतीय समाजमन माणसांना चौकटीत बसवण्यास उत्सुक असते. एकाच झापडबंद दृष्टीने व्यक्ती आणि कार्याकडे बघण्याचा प्रयत्न करते. पण याच भारताची दुसरी ...

बांगलादेश राजकीय अस्थिरता; भारताला संधी

तिरुपूर: कापड उद्योग: फोटो बिजनेस स्टॅडंर्ड  बटरफ्लाय इफेक्ट... ही संकल्पना आता सर्वत्र झाली आहे. म्हणजे हजारो मैलांवर एखादी घटना घडते किंवा घडत असते आणि तिचे चांगले-वाईट परिणाम जगाच्या दुसऱ्या टोकाला दिसून येऊ शकतात. तसेच काहीसे एकोणिसाव्या शतकात भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्राच्या बाबतीत घडले.  उत्तर अमेरिका हा कापसाचा मोठा उत्पादक होता. मँचेस्टर वगैरे मधील वस्त्रोद्योगा साठी कच्चा माल मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण. कच्चा माल मिळण्याचे स्रोत खात्रीशीर आणि भारतासह सर्व वसाहती या हक्काची बाजारपेठ म्हणून उपलब्ध होत्या. हा व्यापार ब्रिटिशांसाठी लाभदायक होता. भारताकडे येणारा मार्ग 'केप ऑफ गुड होप' ला वळसा घालून येणारा, लांबचाच असला तरी लाभदायक होता. अमेरिकेच्या दक्षिणेकडील राज्यात हे कापसाचे प्रचंड उत्पादन होते आणि आफ्रिकेतून नेलेले गुलाम तिथे राबत असत. अब्राहम लिंकनच्या काळात गुलामी असावी की असू नये या प्रमुख मुद्द्यावरुन उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील राज्यात गृहयुद्ध पेटले. या युद्धात लाखांच्या घरात मनुष्यहानी झालीच पण ब्रिटिशांना मिळणारा हक्काचा कापूस पुरवठा झपाट्याने कमी झाला.  अश...

सह अस्तित्वाचे प्रश्न:

सह अस्तित्वासाठी मुस्लिम समाजाकडून हिंदूंच्या अपेक्षा  भारत हा विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक प्रवाहांचा गोपाळकाला आहे. एक चावून चोथा झालेलं वाक्य वापरायचे तर अनेक धर्म, सांस्कृतिक परंपरा इथे गुण्यागोविंदाने राहतात. खरेच राहतात? राहत असल्या असत्या तर 'सह अस्तित्वाचे प्रश्न' आपल्याला विचारावे लागले असते का?  भारत प्राचीन काळापासून कायमच सांस्कृतिक अखंडता असणारे, विविध राज्यांत, राज्यपद्धतीत नांदणारे राष्ट्र राहिले आहे. भारतीय विचारात आसेतुहिमाचल राजकीय प्रभुत्वाची, सार्वभौमत्वाची चक्रवर्ती ही संकल्पना आहे. प्राचीन काळापासून भारताने अनेक आक्रमणे झेलली. त्यातली बहुतांश पचवली. आक्रमक भारतीय विचारात, संस्कृतीत एकरूप झाले, मिसळून गेले. आक्रमकांना पचवून, त्यांना आपलंसं करुन सह अस्तित्वाचा एक आदर्श उभा करणारी ही संस्कृती मध्ययुगीन कालखंडाच्या सुरुवातीला आलेल्या, एका धार्मिक आक्रमणाने इतकी कोलमडली कशी? इतकी कोलमडली की त्यामुळे सह अस्तित्वाचे प्रश्न निर्माण होऊ लागले. त्याचे एक कारण निश्चितच भारतीय वैचारिक जगतात आलेले एक औदासिन्य, आत्ममग्नता आणि वाढती सामाजिक विषमता हे आहेच. ते नाका...