Skip to main content

ताश्कंद फाईल्स : विचारात पाडणारा सिनेमा






‘Your Prime Minister is Dead’ अशी बातमी एखाद्या देशाच्या पंतप्रधानासंबंधी परदेशातून आली तर काय होईल? साहजिकच देशभर दु:खाची काहीशी निराशेची भावना तयार होईल. त्यातही जर तो पंतप्रधान एका युद्धाचं यशस्वी नेतृत्व करू शकलेला पंतप्रधान असेल तर भावना अधिक तीव्र होते. तो पंतप्रधान युद्ध जिंकल्यानंतर देशाच्या आर्थिक नाइलाजापोटी शांतता करार करण्यासाठी परदेशात जातो. करारावर स्वाक्षऱ्या करतो आणि त्यानंतर काही तासात त्या पंतप्रधानाचा मृत्यू होतो. त्यानंतर देशात भावना दु:खाची नाही तर संशयाची तयार व्हायला हवी होती. राजकीय पातळीवर, सामाजिक पातळीवर हा प्रश्न उपस्थित होणे आवश्यक होते की पंतप्रधानांच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी व्हावी. योग्य ते सर्व वैद्यकीय अहवाल तपासले जावेत  आणि शवविच्छेदन अहवाल तपासला जावा. समोर येते ती माहिती अशी की शवविच्छेदन तपासणी Post Mortem केले गेलेलेच नाही. हाच धागा पकडून माहिती अधिकार कार्यकर्ते अनुज धर यांनी अथक अभ्यासातून एक वेगळा दृष्टिकोन मांडणारे पुस्तक प्रसिद्ध केले. ‘Your Prime Minister is Dead’l  त्यावर आधारित प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी वेगळ्या धाटणीचा सिनेमा केला आहे. ताश्कंद फाईल्स. त्याच्या केंद्रस्थानी आहे स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांचा गुढ मृत्यू.
सिनेमा सुरू होतो लाल बहादुर शास्त्रींच्या आवाजातील भाषणाने ज्यात ते पाकिस्तानच्या आगळिकीला शस्त्राने उत्तर देण्याची आवश्यकता अधोरेखित करताना दिसतात. ताश्कंद करारावरील सह्या आणि शास्त्रीजींचा मृत्यू इथपर्यंत दुसर्‍या सीनमध्ये दिसते ते 1992 सालातील लाटव्हियाची राजधानी रिगामधील ब्रिटिश दूतावास. एक माणूस मोठाल्या सुटकेस घेऊन अवतरतो. मिनतवारीने ब्रिटिश राजदूतांची भेट घेतो. सुटकेसमध्ये असतात सोव्हियत रशियाची पाताळयंत्री गुप्तहेर संघटना केजीबीची गुप्त कागदपत्रे. त्यात केजीबीने जगभरात काय उत्पात माजवला होता. देशोदेशीच्या नेत्यांच्या हत्या घडवून आणल्या होत्या. याचे अहवाल तो माणूस म्हणजे केजीबीच्या अभिलेखागाराचा माजी प्रमुख व्हॅसिली मित्रोखीन. तिथून सिनेमा येतो आजच्या काळात, दिल्लीत एक राजकीय पत्रकार जी एका ‘स्कूप’ च्या शोधात आहे. तिला निनावी फोनद्वांरे शास्त्रीजींचा मृत्यू हा विषय सुचवला जातो  आणि संबंधित कागदपत्रे पुरवली जातात. तिच्या वर्तमानपत्रात गूढ मृत्यूची कथा हेडलाईन म्हणून छापली जाते आणि सुरू होतो राजकीय गदारोळ. त्यातून केंद्रीय गृहमंत्री (नासिरुद्दीन शहा) विरोधी पक्ष नेता श्याम सुंदर त्रिपाठी (मिथुन चक्रवर्ती) यांच्या नेतृत्वाखाली समितीचे गठन करतात आणि सुरू होतो कोर्टरूम ड्रामा. त्यापुढील कथाभाग सिनेमात पाहणेच अधिक चांगले.
विवेक अग्निहोत्री यांनी हा तसा डॉक्युमेंटरीचा असलेला विषय ‘फीचर फिल्म’ स्वरूपात उत्तम पटकथेत बांधला आहे. त्यात विद्यमान राजकीय, सामाजिक प्रवाह उत्तमरीत्या उभे केले आहेत. प्रस्थापित तथाकथित बुद्धिजीवी इतिहासकारांचे प्रतिनिधित्व करणारे पल्लवी जोशी यांनी साकारलेले पात्र, तथाकथित पंचतारांकित समाजसेवेच्या आडून एका फुटीरतावादी, अराजकतावादी विचारसरणीचा प्रसार-प्रचार करणाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारे मंदिरा बेदी यांनी साकारलेले पात्र निवृत्तीनंतर विविध कमिट्या किंवा सरकारी पदांसाठी सरकारच्या ‘गुड बुक्स’ मध्ये राहण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारे विश्व मोहन बडोला यांनी साकारलेले पात्र, गुप्तचर यंत्रणेचे माजी प्रमुख यांचे पात्र प्रकाश बेलवडी, राष्ट्रीय अभिलेखागाराचे माजी प्रमुख यांचे पात्र राजेश शर्मा यांनी साकारले आहे. ‘यह देश गांधी नेहरू का देश है’ असा सातत्याने उद्घोष करणारे आणि शास्त्रीजीका क्यों नही?’ या प्रश्नावर चवताळून उठणारे एका राजकीय पक्षाच्या युवा वाहिनीचे प्रमुख हे पात्र, आणि डबल एजंट, देशद्रोही मानल्या गेलेल्या माजी गुप्तचर अधिकाऱ्याचे पात्र जे विनय पाठक यांनी साकारले आहे. त्याचप्रमाणे मुख्य कथा घोटाळते ते पात्र श्वेता बसू प्रसादने उभे केले आहे. सिनेमाची मांडणी, त्यातला आशय खिळवून ठेवणारा असला तरी रूढार्थाने  मनोरंजनात्मक सिनेमा नाही.
लाल बहादुर शास्त्रींच्या मृत्यूसंबंधी विविध विचार करायला लावणारा हा सिनेमा आहे. त्याचबरोबर त्यांच्या मृत्यूमुळे कोणाला काय फायदा झाला असता किंवा झाला आहे याची चर्चा उत्तरार्धात करण्यात आली आहे. ‘मित्रोखीन अर्काइव्हज’ नुसार शीतयुद्धकाळात भारत आंतरराष्ट्रीय हेरसंस्थांसाठी कसे नंदनवन होता. तत्कालीन भारतात वर्तमानपत्रे, बुद्धिजीवी, सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील अनेक नेते केजीबीच्या प्रभावाखाली कसे होते याची धक्कादायक माहिती समोर येत जाते. दिल्लीचा ‘ल्युटीअन्स’ भाग कसा आजही सत्तेच्या प्रांगणात महत्त्वाचा आहे. ल्युटीअन्स हा केवळ एक भाग नाही तर कंपू, कोंडाळे, विचारसरणी आहे त्याच्या बाहेरील व्यक्ती सर्वोच्च पदी बसलेली त्यांना सहन होत नाही. त्या वर्तुळाबाहेरचे फार कमी लोक सर्वोच्च पदावर बसू शकले आहेत. त्यातील एक शास्त्रीजी होते. शास्त्रीजींचे हरितक्रांती, लष्कराचे बळकटीकरण आणि त्यासारखे इतर अनेक निर्णय ल्युटीअन्स आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरून वावरणाऱ्या अनेकांसाठी त्रासदायक ठरू शकणार होते का? 1965 च्या युद्धातील विजय काही आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत व्यक्ती संस्थांसाठी त्रासदायक ठरू शकणार होता का? अशा अनेक प्रश्नांचा भुंगा हा चित्रपट विचार करू शकणाऱ्या प्रत्येकाच्या मनात सोडतो. एका विशिष्ट वर्तुळाच्या विचारसरणीला त्यांनी मांडलेल्या ‘नॅरेटिव्ह’ला धक्का देणारा प्रश्न विचारणारा हा सिनेमा आहे. त्यामुळे त्या वर्तुळाशी जवळ असणाऱ्या माध्यमांनी या सिनेमाची दखलच घेतलेली नाही किंवा पूर्वग्रहदूषित समीक्षा, अभिप्राय व्यक्त केले आहेत. ते काहीही असले तरी एकदा अवश्य पहावा असा वैचारिक खाद्य पुरवणारा हा सिनेमा - ताश्कंद फाईल्स.


पूर्वप्रसिद्धी: साप्ताहिक 'स्वतंत्र नागरिक'

Comments

Popular posts from this blog

राम मंदिर: राम विचार, राम विधान

उदंड जाहले पाणी  स्नानसंध्या करावया  जप तप अनुष्ठाने, आनंदवनभुवनी।। बुडाली सर्वही पापे हिंदुस्थान बळावले  अभक्तांचा क्षयो झाला, आनंदवनभुवनी।। साक्षेपी लेखक, विचारवंत नरहर कुरुंदकर शिवाजी महाराजांवरील व्याख्यानात म्हणतात, "उदंड जाहले पाणी स्नानसंध्या करावया, हे पाणी उदंड तेव्हाच होते जेव्हा दोन्ही तीरांवर हिंदूंचे राज्य असेल नाही तर तेच पाणी उडी मारून आत्महत्या करण्याच्या योग्य ठरते"  आज अयोध्येत श्रीरामलला विराजमानची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीरामरायाकडे क्षमायाचना केली. आमच्या पुरुषार्थात, एकीत, क्षात्रतेजात काही कमतरता होती म्हणून हे श्रीराममंदीर होण्यास इतका विलंब झाला. पण आता श्रीराम विराजमान झाले आहेत. हा अभूतपूर्व क्षण आहे, आणि श्रीराम नक्कीच आपल्याला क्षमा करतील.  आजचा दिवस हा शरयू-गंगा-भागीरथीचे पाणी उदंड करणारा आहे. नर्मदा, सिंधू, गौतमी, कावेरी, वाशिष्ठी, कृष्णा, ब्रह्मपुत्र, महानदीचे पाणी उदंड करणारा आहे. हा क्षण आपण सर्वानी याची देही याची डोळा अनुभवला! धन्य झालो.   हा अभूतपूर्व क्षण अनुभवत असतानाच अनेक विचार अखंडपणे येत आहेत. काय आहे

अथातो बिंब जिज्ञासा

अथातो ब्रह्म जिज्ञासा, असे म्हणत ऋषीमुनींनी या विश्वाचे रहस्य जाणून घेण्यासाठी गहन चर्चा केल्या. त्याचे रूपांतर वेद-उपनिषद, पुराणे यात झाले. त्यासोबतच एक प्रगल्भ समाज उभा राहिला, त्यांच्या पूजा पद्धती, उपासना पद्धती विकसित होत गेल्या. त्या क्रमाने विकसित होत निसर्ग-नैसर्गिक शक्तींची पूजा, यज्ञाद्वारे आहुती देणे ते प्रतीक निर्माण ते प्रतिमा निर्मिती इथवर पोचल्या. श्रेष्ठ मूर्तिविज्ञान साधक, संशोधक डॉ. गोरक्षनाथ तथा गो. ब. देगलूरकर, मांडतात, "ऋग्वेदात श्री विष्णूच्या संबंधी सहा ऋचा आहेत, त्या एका अर्थी विष्णूच्या 'शाब्दिक प्रतिमाच' आहेत. या शाब्दिक प्रतिमेचे प्रत्यक्ष प्रतिमेत रुपांतर करण्यासाठी पाषाण वापरले गेले. ते मग एका कुंपणाने बंदिस्त केले गेले. त्याला 'नारायण वाटक' म्हणू लागले" मूर्ती घडवणे, त्यांचे उपासना, पूजा यातील वाढते महत्त्व, त्यांचे अर्थ हा विषय गहन आहे तरीही उद्बोधक आहे. हाच देगलूरकर यांचा ध्यास आहे. तो आजवर अनेक पुस्तकांमधून समोर आला आहेच, त्यात 'अथातो बिंब जिज्ञासा' या टागोर फेलोशिप साठी लिहिलेल्या थिसीसची भर पडली आहे. तोच थिसीस मूर्ती,

वार्षिक अर्थसंकल्प: Part 1

  अर्थमंत्री २०२३-२४ साठीचा अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी.  १ फेब्रुवारी जवळ येऊ लागतो तसे आता अर्थसंकल्पाचे वेध लागतात . पूर्वी ते २८ फेब्रुवारी येतायेता लागत असत . नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने हा प्रघात बदलून १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केली . ती का केली , त्याचे काय परिणाम इत्यादी विषय अनेक वेळा चर्चेला येऊन गेले आहेत . गेल्या ५ हुन अधिक वर्षांत त्याचे लाभही दिसून आले आहेत . तरीही उजळणी स्वरूपात चर्चा केली जाणार आहे . अर्थसंकल्प येण्यापूर्वी या देशाचा अर्थसंकल्प या संकल्पनेवर आधारित विविध घटकांची चर्चा करण्याचा इथे प्रयत्न आहे . प्रक्रिया समजावून सांगण्याचा प्रयत्न आहे . घटनात्मक तरतुदी दर वर्षी फेब्रुवारी महिन्यात समस्त भारत अर्थसंकल्पाकडे डोळे लावून बसलेला असतो . अर्थसंकल्पात काय मांडणी आहे यावर देश वर्षभरात कसा वाटचाल करणार आहे हे निश्चित होत असते , तसेच गेल्या वर्षभराचा आढावा देखील त्यात असतो . भारतीय संविधानाच्या भाग ५ मध्ये केंद्र सरकार , सं