Skip to main content

डंकर्क: माघार की यशाची सुरुवात 

दोन सिनेमे, दोन दृष्टिकोन, इतिहास बदलणारा घटनाक्रम 


दुसऱ्या महायुद्धाचे ढग दाटून आले होते. नाझी जर्मनीच्या पँझर तुकड्या झपाट्याने वाटचाल करत होत्या. दोस्त राष्ट्रांच्या फौजा सर्वत्र माघार घेत होत्या. फ्रेंचांनी तर जवळ जवळ लढाईआधीच शस्त्र टाकल्यासारखे होते. जर्मन फौजांनी दोस्त राष्ट्रांच्या फौजांना फ्रान्समधील कॅले, डंकर्कच्या किनाऱ्यांवर कोंडले होते. हताश, हतबल ब्रिटिश, फ्रेंच फौजा भीतीच्या साम्राज्यात आपल्या नावाच्या गोळीची किंवा बॉम्बची वाट बघत होत्या. जिवाच्या आकांताने तिथून निघून ब्रिटिश भूमीवर परतण्याचा प्रयत्न करत होत्या. पण त्या समुद्र किनाऱ्यांच्या परिसरात ४ लाखावर सैनिक अडकले होते. युद्धनौकांची संख्या तुटपुंजी होती. त्यात जर्मन वायुसेना 'लुफतवाफ' त्या परिसरात वेळोवेळी बॉम्बफेक करत होती. त्या बॉम्बफेकीत अनेक युद्धनौका ज्या अडकलेल्या सैनिकांना घेऊन जात होत्या त्या इंग्लिश खाडीत बुडवल्या. सर्वत्र दहशत, भीतीचे, मृत्यूच्या सावटाखालील वातावरण. अशा ठिकाणी ब्रिटिश नौसेनेचे रिअर ऍडमिरल डंकर्कच्या परिसरात पाय रोवून उभे होते. आपल्या सैनिकांना सुरक्षित  मायदेशी नेण्याची धडपड आणि दुसऱ्या बाजूला प्रचंड संख्येने मारल्या जाणाऱ्या सैनिकांकडे हताशपणे बघणारे रिअर ऍडमिरल दुर्बिणीतून समुद्राकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर मंद स्मित उमटतं. त्यांच्या शेजारी उभे असणारे एक अधीकारी विचारतात,  "What do you see sir?" त्याला उत्तर म्हणून रिअर ऍडमिरल एकच शब्द उच्चारतात, "Home..... " २०१७ मध्ये ख्रिस्तोफर नोलान दिग्दर्शित 'डंकर्क' या चित्रपटातील हा प्रसंग शेवटाकडे येत असताना येतो. चित्रपट गृहात हा प्रसंग पाहिल्यानंतर उमटलेले समाधानाचे, आनंदाचे सुस्कारे चित्रपटाच्या यशाची साक्ष देऊन गेले होते. 

जागतिक इतिहासात दोन महायुद्धांचे अनन्यसाधारण महत्व आहे. त्यातही दुसऱ्या महायुद्धाचा रोख, बाजू बदलणाऱ्या ज्या महत्वपूर्ण घटना घडल्या त्यात नुकताच ज्या घटनेचा ७५ वा स्मृतीदिन साजरा करण्यात आला तो डी-डे, म्हणजेच १९४४ मध्ये अमेरिकेसह दोस्त राष्ट्रांचे सैन्य फ्रान्सच्या नॉर्मंडी किनाऱ्यावर उतरली आणि जर्मन सैन्याच्या पश्चिम आघाडीवरून पीछेहाटीला सुरुवात झाली ती घटना,

 लेनिनग्राडचा लढा, जिथून जर्मन सैन्याच्या पूर्व आघाडीवरील पीछेहाटीची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यात डंकर्क च्या 'यशस्वी माघारीचे' महत्व अनन्यसाधारण आहे. दुसरे महायुद्ध, त्यातील महत्वपूर्ण घटना चित्रपटकर्त्यांना कायमच आकर्षित करत आल्या आहेत. त्यात अजरामर स्थान मिळवलेले तुलनेने अलीकडील चित्रपट आहेत ते म्हणजे स्टीव्हन स्पीलबर्गचा सेव्हिंग प्रायव्हेट रायन, एनेमी अट द गेट्स, पर्ल हार्बर इत्यादी चित्रपटांच्या यादीत डंकर्क च्या घटनेवर वेगवेगळ्या बाजूने भाष्य करणारे दोन सिनेमे नुकतेच येऊन गेले. त्यातला पहिला नोलानचा डंकर्क आणि दुसरा जो राईटने दिग्दर्शित केलेला, गॅरी ओल्डमॅन यांचा अप्रतिम अभिनय असणारा डार्केस्त अवर हा सिनेमा. नोलानचा डंकर्क आपल्याला थेट डंकर्कच्या किनाऱ्यावर त्याहीपेक्षा जास्त तेथील सैनिकांच्या मनात घेऊन जातो. त्या भीतीचा मूर्तिमंत अनुभव देतो तर डार्केस्त अवर त्याच काळात ब्रिटनच्या राजकारणात, सत्तेच्या वर्तुळात चालणाऱ्या घडामोडी दाखवतो. एकच घटना किंवा त्या घटनाक्रमाचा काळ दोन वेगवेगळ्या बाजुंनी दाखवणारे हे सिनेमे. 

डार्केस्त अवर हा सिनेमा सुरू होतो तत्कालीन ब्रिटिश संसदेत विरोधी पक्ष नेते क्लेमंट आटली यांच्या घणाघाती भाषणाने. पंतप्रधान चेंबर्लेन यांची फसलेली परराष्ट्र नीती, घोंघावणारं युद्ध यांची हाताळणी त्यांच्याकडून होणार नाही. या राष्ट्राला नवा नेता हवा आहे आणि त्या नव्या नेतृत्वासह विरोधी पक्ष राष्ट्रीय सरकार बनवण्यास टायर असल्याचे ते मांडतात. चेंबर्लेन राजीनामा देतात आणि अनिच्छेनेच विन्स्टन चर्चिल यांची निवड केली जाते. चर्चिल यांच्या संसदेतील पहिल्या भाषणाला स्वपक्षातून पाठिंबा मिळत नाही. कारण ते हिटलरचा युद्धाने सामना करण्याचा निश्चय व्यक्त करतात. स्वपक्षाचा पाठिंबा नाही. युद्ध घोंघावत आहे. त्यातच डंकर्कला इतक्या प्रचंड प्रमाणात सैन्य अडकलेले आहे. तेव्हा चर्चिल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट यांच्याशीही चर्चा करतात. मंत्रिमंडळातील सदस्य कॉउंट हॅलिफॅक्स यांना राजासह इतर नेत्यांचा पाठिंबा आहे. चर्चिल यांना जवळ जवळ डावलून हिटलरशी समझोता करण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या कामी लागतात. चर्चिल त्याचवेळी नौसेनेच्या कायम संपर्कात असतात. नौसेना प्रमुखांना नागरी जहाजांचा ताफा जमवण्याचा आदेश दिला जातो. नौसेनेच्या इतिहासातील सर्वात  जहाजांचा ताफा जमवला जातो. चर्चिल निर्णय देतात, हा ताफा डंकर्कच्या मोहिमेवर पाठवा. ह्या मोहिमेला नाव... ऑपरेशन डायनॅमो! त्या दरम्यान चर्चिल थेट जनमताचा अंदाज घेण्याचा निर्णय घेतात. हा प्रसंग चित्रपटात चर्चिल अचानक लंडनच्या ट्यूब म्हणजेच मेट्रो रेल्वेत जाऊन, जनतेशी संवाद साधतात. जनता कुठल्याही परिस्थितीत लढण्याच्या तयारीत आहे हे पाहताच चर्चिल समझोता प्रस्ताव वगैरे रद्द करतात. आणि थेट संसदेला सामोरे जातात. त्या वेळी ते संसदेत अजरामर भाषण करतात. "We Shall fight on the lands, we shall fight in seas and oceans, we shall fight in the air.. We shll never surrender!" गॅरी ओल्डमॅन यांचा अप्रतिम अभिनय, हे कोणालाही जोश देणारं भाषण या ठिकाणी चित्रपट संपतो. 

दुसरा चित्रपट, डंकर्क. तीन पातळ्यांवर चित्रपट उभा केलेला आहे. डंकर्कच्या किनाऱ्यावर मृत्यूच्या सावटाखाली जहाजाची वाट पाहणारे सैनिक. जर्मन लढाऊ विमानांचा सामना करू पाहणारी ब्रिटिश लढाऊ विमाने. ब्रिटनच्या किनाऱ्यावरून निघालेले जहाज. किनाऱ्यावर दोघे विशीतले सैनिक. जर्मन सैन्याने टाकलेली पत्रके पाहून भेदरून गेलेली. केवळ समोर असलेल्या जहाजात जायला मिळेल आणि जीव वाचेल या अपेक्षेने जखमी सैनिकांना वाहून नेतात. पण जहाजांत जायला मिळत नाही. महत्प्रयासाने एका जहाजात प्रवेश मिळतो. पण जर्मन विमानांनी केलेल्या हल्ल्यात ते जहाज उध्वस्त होते. पुन्हा किनारा. पुन्हा मृत्यूचे सावट. त्या दोघांच्या नजरेने नोलान आपल्याला त्या परिसरातली मूर्तिमंत भीती दाखवतो. जगण्याची धडपड दाखवतो. दुसऱ्या पातळीवर आकाशात ब्रिटिश विमाने आणि जर्मन विमानांतील झगडा. ज्यात एक विमान  समुद्रात कोसळते. तो वैमानिक ब्रिटनमधून येणाऱ्या जहाजात पोचतो. दुसरा प्रमुख वैमानिक, विमानातील इंधन संपेपर्यंत लढतो. इंधन संपल्यावर शांतपणे किनाऱ्यावरच विमान उतरवतो. विमानाला आग लावतो. शांतपणे जर्मन सैनिकांच्या स्वाधीन होतो. किनाऱ्यावरचे दोघे प्रचंड धडपडीनंतर अखेर एका छोट्या जहाजावर चढतात. ब्रिटनच्या किनाऱ्याला लागतात. किनाऱ्यावर एक अंध म्हातारा या सैनिकांना पांघरूण वाटत असतो. या माघार घेतलेल्या सैनिकांचे ब्रिटनमध्ये स्वागतच केले जात असते. हे सैनिक रेल्वेने आपापल्या घराकडे जात असतात. त्या दरम्यान त्यांच्या हाताला वर्तमानपत्र लागते. त्यात डंकर्कविषयी बातम्यांसोबतच एक बातमी असते, चर्चिल यांच्या संसदेतील अजरामर भाषणाची. बाहेर फलाटावर या लोक या सैनिकांचे स्वागत करत असतात. तेव्हा हा विशीतला सैनिक त्या भाषणाचा गोषवारा वाचत असतो. "We Shall Never surrender.... " 

हे शब्द, अचाट निर्णयक्षमता, अंमलबजावणी करण्याची क्षमता याच्या जोरावर राष्ट्र कठीण काळात त्या नेत्याच्या पाठीशी उभं राहिलं. या घटनेने दुसऱ्या महायुद्धाचेच नाही तर इतिहासाचे पाट बदलले. हा सर्व घटनाक्रम घडला तो मे महिन्याच्या शेवटच्या आणि जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात. त्या निमित्ताने हे दोन चित्रपट त्यांनी एकाच घटनेचा दोन दृष्टिकोनांतून घेतलेला हा वेध. हे चित्रपट पाहत असताना भारत, भारतीय चित्रपट सृष्टी कायम डोळ्यासमोर येते. जिथे चांगले म्हणता येतील असे युद्धपट अगदी बोटावर मोजता येतील इतकेच आहेत. अलीकडच्या काळात त्यात लक्षणीय वाढ होत आहे. ही त्यातल्या त्यात चांगली गोष्ट आहे. देशाचा उज्वल इतिहास अशा माध्यमांतून समोर येणं, आवश्यक आहे. भारताच्या सैन्याचा उज्वल इतिहास समोर येणे गरजेचे आहे. जिथे भारतीय सैन्याने "We Shall WIn"... हाच दृष्टिकोन सांभाळला आहे. 

Comments

Popular posts from this blog

राम मंदिर: राम विचार, राम विधान

उदंड जाहले पाणी  स्नानसंध्या करावया  जप तप अनुष्ठाने, आनंदवनभुवनी।। बुडाली सर्वही पापे हिंदुस्थान बळावले  अभक्तांचा क्षयो झाला, आनंदवनभुवनी।। साक्षेपी लेखक, विचारवंत नरहर कुरुंदकर शिवाजी महाराजांवरील व्याख्यानात म्हणतात, "उदंड जाहले पाणी स्नानसंध्या करावया, हे पाणी उदंड तेव्हाच होते जेव्हा दोन्ही तीरांवर हिंदूंचे राज्य असेल नाही तर तेच पाणी उडी मारून आत्महत्या करण्याच्या योग्य ठरते"  आज अयोध्येत श्रीरामलला विराजमानची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीरामरायाकडे क्षमायाचना केली. आमच्या पुरुषार्थात, एकीत, क्षात्रतेजात काही कमतरता होती म्हणून हे श्रीराममंदीर होण्यास इतका विलंब झाला. पण आता श्रीराम विराजमान झाले आहेत. हा अभूतपूर्व क्षण आहे, आणि श्रीराम नक्कीच आपल्याला क्षमा करतील.  आजचा दिवस हा शरयू-गंगा-भागीरथीचे पाणी उदंड करणारा आहे. नर्मदा, सिंधू, गौतमी, कावेरी, वाशिष्ठी, कृष्णा, ब्रह्मपुत्र, महानदीचे पाणी उदंड करणारा आहे. हा क्षण आपण सर्वानी याची देही याची डोळा अनुभवला! धन्य झालो.   हा अभूतपूर्व क्षण अनुभवत असतानाच अनेक विचार अखंडपणे येत आहेत. काय आहे

अथातो बिंब जिज्ञासा

अथातो ब्रह्म जिज्ञासा, असे म्हणत ऋषीमुनींनी या विश्वाचे रहस्य जाणून घेण्यासाठी गहन चर्चा केल्या. त्याचे रूपांतर वेद-उपनिषद, पुराणे यात झाले. त्यासोबतच एक प्रगल्भ समाज उभा राहिला, त्यांच्या पूजा पद्धती, उपासना पद्धती विकसित होत गेल्या. त्या क्रमाने विकसित होत निसर्ग-नैसर्गिक शक्तींची पूजा, यज्ञाद्वारे आहुती देणे ते प्रतीक निर्माण ते प्रतिमा निर्मिती इथवर पोचल्या. श्रेष्ठ मूर्तिविज्ञान साधक, संशोधक डॉ. गोरक्षनाथ तथा गो. ब. देगलूरकर, मांडतात, "ऋग्वेदात श्री विष्णूच्या संबंधी सहा ऋचा आहेत, त्या एका अर्थी विष्णूच्या 'शाब्दिक प्रतिमाच' आहेत. या शाब्दिक प्रतिमेचे प्रत्यक्ष प्रतिमेत रुपांतर करण्यासाठी पाषाण वापरले गेले. ते मग एका कुंपणाने बंदिस्त केले गेले. त्याला 'नारायण वाटक' म्हणू लागले" मूर्ती घडवणे, त्यांचे उपासना, पूजा यातील वाढते महत्त्व, त्यांचे अर्थ हा विषय गहन आहे तरीही उद्बोधक आहे. हाच देगलूरकर यांचा ध्यास आहे. तो आजवर अनेक पुस्तकांमधून समोर आला आहेच, त्यात 'अथातो बिंब जिज्ञासा' या टागोर फेलोशिप साठी लिहिलेल्या थिसीसची भर पडली आहे. तोच थिसीस मूर्ती,

वार्षिक अर्थसंकल्प: Part 1

  अर्थमंत्री २०२३-२४ साठीचा अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी.  १ फेब्रुवारी जवळ येऊ लागतो तसे आता अर्थसंकल्पाचे वेध लागतात . पूर्वी ते २८ फेब्रुवारी येतायेता लागत असत . नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने हा प्रघात बदलून १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केली . ती का केली , त्याचे काय परिणाम इत्यादी विषय अनेक वेळा चर्चेला येऊन गेले आहेत . गेल्या ५ हुन अधिक वर्षांत त्याचे लाभही दिसून आले आहेत . तरीही उजळणी स्वरूपात चर्चा केली जाणार आहे . अर्थसंकल्प येण्यापूर्वी या देशाचा अर्थसंकल्प या संकल्पनेवर आधारित विविध घटकांची चर्चा करण्याचा इथे प्रयत्न आहे . प्रक्रिया समजावून सांगण्याचा प्रयत्न आहे . घटनात्मक तरतुदी दर वर्षी फेब्रुवारी महिन्यात समस्त भारत अर्थसंकल्पाकडे डोळे लावून बसलेला असतो . अर्थसंकल्पात काय मांडणी आहे यावर देश वर्षभरात कसा वाटचाल करणार आहे हे निश्चित होत असते , तसेच गेल्या वर्षभराचा आढावा देखील त्यात असतो . भारतीय संविधानाच्या भाग ५ मध्ये केंद्र सरकार , सं