Skip to main content

दोन दिवस, दोन विचार आणि राष्ट्रीय उत्थान

          

 एप्रिल महिन्यातले दोन पाठोपाठचे दिवस. भारताच्या इतिहासाला विलक्षण कलाटणी देणारे. राष्ट्र उत्थान घडवणारे दिवस. 

त्यातल्या ५ एप्रिल या दिवशी, किंबहुना रात्री त्रिखंडात गाजेल असा पराक्रम हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराजांनी केला. ६ एप्रिल या दिवशी सामान्य माणसाच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयाला हात घालून जनमानस जागवणारा, समाजाचा 'सामाजिक पुरुषार्थ' जागवणारा पराक्रम महात्मा गांधींनी केला. हे दोन एकाच महिन्यातले पाठोपाठचे दिवस असले तरी काळ भिन्न, परिस्थिती भिन्न पण परिणाम मात्र एकच आहे तो म्हणजे राष्ट्रउत्थान. 

प्राचीन काळापासूनचा हिंदू राजांच्या इतिहासाचे पाट शिवाजीच्या अतूट पराक्रमाने बदलले. हे राज्य 'श्री'चे आहे म्हणत सामान्य माणूस या कार्यासाठी जोडला. आधुनिक राष्ट्रविचार, ते राष्ट्र उभं करण्यासाठी सामान्यातल्या सामान्य माणसाला राष्ट्रकार्यासाठी एकजूट करण्यासाठी सामान्य माणसाच्या पातळीवर सहज शक्य असणारे कार्यक्रम आणि त्याद्वारे देशव्यापी चळवळ महात्मा गांधी यांनी उभी केली. चळवळीसाठी अनुसरलेला तो मार्ग अवघ्या जगात चळवळींसाठी मार्गदर्शक ठरला.



 शिवाजी महाराजांच्या आयुष्यात अचाट, नाट्यमय घटनांना तोटा नाही. पण ही गोष्टही तितकीच सत्य आहे की शिवाजी महाराज त्या नाट्यमय घटनांपुरतेच सीमित नाहीत. असू नयेत. पण सध्याचा तो विषय नाही. 

नोव्हेंबर १६५९ अफजलखान वध. प्रतापगडाच्या माचीवर झालेली भेट आणि शिवाजीने खानाचा काढलेला कोथळा ही नाट्यमय घटना, पराक्रमाची आहेच खरी. पण त्या पाठोपाठ एक इतिहाचे पाट बदलणारी घटनांची साखळी आहे. तो एक सलग राजकारणाचा भाग आहे याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. 

या सलग राजकारणाचा प्रारंभ शिवाजीने जावळी काबीज करणे, प्रतापगडाचे बांधकाम वेगाने पूर्ण करणे इथपासून होतो. पुढे अफजलखान वध आणि अत्यंत नियोजनपूर्वक खानाच्या सैन्याचा संपूर्ण पाडाव आहे. इथेच इतिहासाचे पाट बदलणारी घटना आहे. असा मोठा धक्का दिल्यानंतर शिवाजी विजयाच्या उत्सवात नाही तर धक्का ओसरायच्या आत राज्य बळकट करण्याकडे वळले आहेत. पन्हाळा जिंकणे, पावनखिंड, विशाळगड हा सगळा घटनाक्रम पुढे आहे. 

त्याचवेळी शाहिस्ताखान पुण्यात तळ ठोकून आहे. खूप मोठा प्रदेश त्याच्या सैन्याने व्यापला आहे. कारतलबखानच्या नेतृत्वाखालची कोकण स्वारी आणि शिवाजीने उंबरखिंडीत त्याच्या सैन्याचा केलेला पराभव ही पुढील पराक्रमाची नांदी ठरली. त्याची पुढली पायरी म्हणजे जवळ जवळ लाखाच्या छावणीत मोजक्या लोकांनी जाऊन थेट शाईस्ताखानाला मारण्याची योजना आहे. या योजनेची गुणात्मक व्याप्ती पाहता गुप्तहेर यंत्रणेची महती पुन्हा एकदा अधोरेखित होते. कारण कुठल्या सरदाराचा तळ कुठे आहे, पहारे केव्हा बदलतात यासोबतच सामाजिक, धार्मिक कारणांचा अभ्यास देखील खूप महत्वाचा आहे. त्या काळात रमजानचे रोजे सुरू होते. तेव्हा सूर्यास्तानंतर भरपेट जेवून मुस्लिम सरदार आणि सैन्य सुस्तावलेले असणार आणि सूर्योदयापूर्वीच्या जेवणाची तयारी करण्यात गुंतणार ह्याचीदेखील नोंद घेण्यात आली होती.

 दिवस निवडण्यात आला होता चैत्र शुद्ध अष्टमी. रामनवमीच्या एक दिवस आधी. तो दिवस ग्रेगेरियन कॅलेंडर नुसार ५ एप्रिल १६६३.  संपूर्णपणे नव्या, कल्पक युद्ध योजना आखणारा राजा आहे, जो राज्य श्रींचे आहे या भावनेवर विश्वास राखतो, त्यामुळे अठरापगड जातीचे लोक त्याच्या कार्याला आपलं मानून त्याला हातभार लावतात. संभाजीच्या मृत्यूनंतर औरंगजेबाच्या सेनेविरोधात उपलब्ध सर्व साधनांनिशी सलग २७ वर्ष कोणीही भक्कम नेता नसताना लढा देतात. म्हणून ५ एप्रिल हा दिवस भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारा एक महत्वपूर्ण दिवस आहे.



 एक समर्पक वाक्य सशस्त्र क्रांतिकारी आणि महात्मा गांधींचा सत्याग्रहाचा मार्ग याविषयी मांडलं जातं, ते असं की "सशस्त्र क्रांतिकार्य खूप थोड्या लोकांकडून प्रचंड मोठ्या त्यागाची अपेक्षा धरते तर महात्मा गांधींचा मार्ग प्रचंड संख्येकडून थोड्या त्यागाची अपेक्षा करतो." गांधीजींनी सर्व चळवळ या आधारावर उभी केली. सामान्य माणसाच्या जवळ असणारे विषय घेतले. संघटनात्मक बांधणी कार्यबाहुल्यावर आधारित केली. देशव्यापी आंदोलने सत्याग्रहाच्या मार्गाने करायचीच पण जेव्हा आंदोलन नसेल तेव्हा 'स्वदेशी' या तत्वावर आधारित कार्य करावे. त्यात चरखा, खादी, राष्ट्रीय शिक्षण इत्यादी सर्व कार्य आहेत. त्यामुळेच सामान्य माणूस जो आपल्या पातळीवर हे सर्व कार्य करत स्वातंत्र्य चळवळीला हातभार लावू शकला. 

१९३० साली लाहोर काँग्रेस मध्ये 'पूर्ण स्वराज्याचा' ठराव केला गेला. तिथे जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस आघाडीवर होते. आणि देशव्यापी आक्रमक चळवळीची गरज व्यक्त करत होते. त्यावेळी काँग्रेसांतर्गत असणाऱ्या राजकारणावर प्रकाश टाकण्याची इथे गरज नाही. मुद्दा हा की गांधीजींनी सामान्य माणसाला अत्यंत आवश्यक अशा मीठावर देखील जाचक कर आहे जो अन्यायी इंग्रज सरकारने लादला आहे, आणि तोच धागा पकडून 'सविनय कायदेभंग' ही अनोखी चळवळ सुरू केली. साबरमती आश्रमातून मोजक्या कार्यकर्त्यांसह दांडी यात्रा सुरू झाली आणि त्याची समाप्ती दांडी येथील मिठागरातील मीठ उचलून झाली. या सविनय कायदेभंगाचा ऐतिहासिक दिवस म्हणजे ६ एप्रिल. ही चळवळ देशभर पसरली. ठिकठिकाणी मीठ सत्याग्रह झाले, जंगल सत्याग्रह झाले. 

या सर्व काळात देशभर भ्रमण करणाऱ्या अमेरिकन पत्रकार विल्यम शिरर याने धारासना वगैरे ठिकाणी झालेले सत्याग्रह पाहिले. शिस्तबद्ध, इंग्रजांच्या लाठीमाराला उलटून प्रतिकार न करणारे पण मागेही न हटणारे सत्याग्रही त्यांनी पाहिले. ते दृश्य पाहून त्यांनी नमूद केले आहे की "भारत देश हा आताच स्वतंत्र झाला आहे. प्रत्यक्ष सत्तांतर ही आता केवळ एक औपचारिकता उरली आहे. 'समाजातला पुरुषार्थ' जागवणारी ही कृती आधुनिक भारताच्या राष्ट्र उत्थानाची कृती आहे.

               दोन दिवस, दोन विचार. एक अचाट पराक्रम आणि राज्यनिर्माण, ज्याने राज्याप्रती बांधिलकीची प्रेरणा निर्माण केली. दुसरा तरल पातळीवरचा पण निग्रही पराक्रम ज्याने 'आधुनिक राष्ट्रीयत्वाची' भावना अधिकाधिक बळकट केली. 

हाच मुद्दा वर्तमानात घेऊन येणे आवश्यक आहे. आणि तो धागा पत्रकार-राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांनी वारंवार मांडला आहे. ते म्हणतात सध्याच्या केवळ पोपटपंची करणाऱ्या यच्चयावत गांधीवाद्यांपेक्षा नरेंद्र मोदी यांना खऱ्या अर्थाने गांधी कळले आहेत आणि अंमलात आणले आहेत. ते कसे तर त्याचे सूतोवाच मोदींनीच २०१४ साली दिलेल्या एका मुलाखतीत केले होते, 

"सरकारी योजनांचे अपयश फक्त गांधींच्या मार्गाने जाऊन थांबवता येईल. महत्त्वाकांक्षी योजना फक्त पैसे खर्चून वा शासकीय पातळीवर राबवून यशस्वी होत नसतात. याला जनतेची साथ लाभली पाहिजे. म्हणूनच सरकारच्या योजनांमध्ये जनतेचा सहभाग वाढवण्यातून त्या योजनांना लोकांचे काम म्हणून लोकसहभागातून यशाच्या मार्गावर आणता येईल.. "

याचेच प्रतिबिंब स्वच्छ भारत अभियान, उज्ज्वला योजना, आयुषमान भारत, विश्वकर्मा, अशा योजना असो की नोटाबदली सारखा प्रचंड उलथापालथ घडवणारा निर्णय असो यात दिसून येते. उज्ज्वला योजना आणण्यापूर्वी सुखवस्तू व्यक्ती-कुटुंबांना गॅस सिलिंडरवर मिळणारे अनुदान परत करण्याचे आवाहन केले आणि १-२ कोटी कुटुंबांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. असलेले अनुदान सोडून देण्याची आणि तेही पंतप्रधानांच्या नुसत्या आवाहनावर, कुठल्याही सक्ती-कायद्याच्या बडग्यापुढे नव्हे ही एक अपूर्व घटना होती. 

हा दृष्टीकोन वैयक्तिक आणि कौटुंबिक पातळीवरच नाही तर उद्योग-व्यवसाय या क्षेत्रातही दिसून आला. 

कोविड महामारी हे जागतिक पातळीवरचे त्या पद्धतीचे एका शतकानंतर उद्भवलेले संकट. त्यात आरोग्य हा घटक महत्त्वाचा होताच पण लॉकडाऊन मुळे विस्कटलेली आर्थिक घडी सावरणे देखील तितकेच आवश्यक होते. त्यासाठी दोन मार्ग उपलब्ध होते, बाजारपेठेत भरमसाठ पैसे छापून ओतणे आणि मागणीला चालना देणे किंवा उद्योग-व्यवसाय तगवणे अधिक सक्षम करणे आणि लोकांची प्राथमिक गरज भागेल अशी सोय करणे. भारताने दुसरा मार्ग स्वीकारला. 

आत्मनिर्भर भारत योजनेत MSME साठी Interest Subvention योजना, हातगाडीवर वगैरे व्यवसाय करणाऱ्यांसाठी स्वनिधी सारखी योजना यातून पुरवठा साखळी वेगाने रुळावर आणली गेली. दुसऱ्या बाजूला गरीब कल्याण योजना याद्वारे महिला जनधन खात्यांवर ५०० रुपये आणि गरीब कल्याण अन्न योजना द्वारे गरिबांना विनाशुल्क खाद्यान्न पुरवले. 

यातून उद्योग-व्यवसाय स्वतःच्या क्षमतेवर पुन्हा उभे राहिले, शासकीय आर्थिक शिस्त राखली गेली, महागाई नियंत्रणात आणण्यास मदत झाली. परिणामी भारत, सर्वाधिक वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था आहे, महागाई आटोक्यात आहे आणि नवा पुरुषार्थ जागृत झालेली भारतभूमी जागतिक पातळीवर एक महत्त्वाची सत्ता म्हणून वागत आहे. 

सर्जिकल स्ट्राईक करणारी सेना, एअर स्ट्राईक करणारी वायुसेना आणि हिंद महासागरात व्यापारी जहाजांचे संरक्षण करणारी नौसेना यातून शिवाजी महाराजांचा विचार, लोकसहभागातून लोककल्याण हा सरकारी दृष्टीकोन यातून एक नवे राष्ट्रीय उत्थान घडत आहे. हे शतक आशियाचे आहे हे खरेच पण ते भारताचे होईल हे निश्चित. दोन दिवस, दोन विचार आणि राष्ट्रीय उत्थान!

Comments

  1. Replies
    1. शौनक तू एक स्तुत्य उपक्रम सुरू केला त्या बद्दल तुझे हार्दिक अभिनंदन राष्ट्रप्रेम राष्ट्रभक्ती व जनजागृती अशीच सुरू ठेव

      Delete
  2. Atishay Sundar, chhan ani abhyaspurna mandani

    ReplyDelete
  3. खूप छान ,अभ्यास पूर्ण आणि दोन घटनांना जोडणारा चांगला विचार
    इतिहासाकडे पाहायचा योग्य दृष्टिकोन

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अथातो बिंब जिज्ञासा

अथातो ब्रह्म जिज्ञासा, असे म्हणत ऋषीमुनींनी या विश्वाचे रहस्य जाणून घेण्यासाठी गहन चर्चा केल्या. त्याचे रूपांतर वेद-उपनिषद, पुराणे यात झाले. त्यासोबतच एक प्रगल्भ समाज उभा राहिला, त्यांच्या पूजा पद्धती, उपासना पद्धती विकसित होत गेल्या. त्या क्रमाने विकसित होत निसर्ग-नैसर्गिक शक्तींची पूजा, यज्ञाद्वारे आहुती देणे ते प्रतीक निर्माण ते प्रतिमा निर्मिती इथवर पोचल्या. श्रेष्ठ मूर्तिविज्ञान साधक, संशोधक डॉ. गोरक्षनाथ तथा गो. ब. देगलूरकर, मांडतात, "ऋग्वेदात श्री विष्णूच्या संबंधी सहा ऋचा आहेत, त्या एका अर्थी विष्णूच्या 'शाब्दिक प्रतिमाच' आहेत. या शाब्दिक प्रतिमेचे प्रत्यक्ष प्रतिमेत रुपांतर करण्यासाठी पाषाण वापरले गेले. ते मग एका कुंपणाने बंदिस्त केले गेले. त्याला 'नारायण वाटक' म्हणू लागले" मूर्ती घडवणे, त्यांचे उपासना, पूजा यातील वाढते महत्त्व, त्यांचे अर्थ हा विषय गहन आहे तरीही उद्बोधक आहे. हाच देगलूरकर यांचा ध्यास आहे. तो आजवर अनेक पुस्तकांमधून समोर आला आहेच, त्यात 'अथातो बिंब जिज्ञासा' या टागोर फेलोशिप साठी लिहिलेल्या थिसीसची भर पडली आहे. तोच थिसीस मूर्ती,...

स्वातंत्र्यवीर सावरकरांची ईश्वरविषयक विचारप्रणाली

                                                'ईश्वर.' जगात जेवढे काही धर्म, जाती, पंथ, समुदाय इ. आहेत ते सगळे कुठल्यातरी ईश्वर नावाच्या अज्ञात शक्तीवर श्रद्धा ठेवून एकत्र आलेले असतात, स्थापन झालेले असतात. प्रत्येक धर्माच्या, जातीच्या ईश्वराबाद्द्लच्या, धार्मिक मान्यताविषयीच्या संकल्पना वेगळ्या असल्या तरी ते श्रद्धेवरच स्थापन झालेले असतात. कित्येक धर्माच्या संस्थापकांनी, तत्वज्ञांनी ईश्वराबद्दल लिहून ठेवलं आहे. हिंदुस्थानात ७००० वर्षांपासून अस्तित्वात असलेला धर्म-संस्कृती म्हणजे 'हिंदू'.  हिंदू धर्माला कोणताही संस्थापक नाही, धर्मग्रंथ नाही, पण हा धर्म वैदिक आर्यांच्या 'वेद' आणि 'उपनिषदे' यांवर आधारलेला आहे. मुळ 'यज्ञ' संकल्पनेनं ईश्वराचं अस्तित्व मानणाऱ्या हिंदू धर्मात कर्मकांडरुपी  थोतान्डावर  भाष्य केलं. ईश्वराच्या अस्तित्वालाच आव्हान देणारे कित्येक तत्वज्ञ होते पण मूळ वेदांचा सखोल अभ्यास करून हिंदू धर्मातील ईश्वराच्या अस्...

डॉ. आंबेडकरांचे आर्थिक चिंतन आणि वर्तमानातील प्रासंगिकता

एक प्रसिद्ध वचन आहे, "some are born great, some achieve greatness and some are those the greatness is thrust on them.." म्हणजे, काही जन्मतःच महान असतात. तर काही आपल्या कार्यातून, कृतीतून महत्पदाला पोचतात. तर काहींवर महानता लादली, थोपली गेलेली असते. प्रस्तुत विषयाला अनुसरून या वचनातला तिसरा भाग अप्रस्तुत आहे. माणूस जन्मतःच महान असतो का? ती जन्मजात महानता त्या माणसाच्या पुढील आयुष्यातील महत्कार्यामुळे सिद्ध होते. थोर, साक्षेपी विचारवंत कुरुंदकर मांडतात त्याप्रमाणे शिवाजी महाराज हे जन्मतःच महान होते असे आपण म्हणतो कारण महाराजांचे संपूर्ण महत्कार्य आपल्या समोर आहे म्हणून. याच न्यायाने भारतीय सामाजिक, राजकीय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक क्षेत्रात आपल्या कृतीतून, कार्यातून महत्पदाला पोचलेले महामानव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्या महामानवाचे महत्कार्य आपल्या समोर आहे, म्हणून आपण अभिमानाने म्हणून शकतो की ते जन्मताच महान होते.  भारतीय समाजमन माणसांना चौकटीत बसवण्यास उत्सुक असते. एकाच झापडबंद दृष्टीने व्यक्ती आणि कार्याकडे बघण्याचा प्रयत्न करते. पण याच भारताची दुसरी ...