Skip to main content

तबलिग जमात, निजामुद्दीन मर्कझ आणि हिंदूंना अक्कल शिकवणारे विद्वान (?)

                   



                    चीनच्या हुबेई प्रांतातील वुहान शहरातून सुरुवात होऊन जगभर पसरलेल्या 'कोविद-१९' किंवा अधिक स्पष्ट म्हणायचं तर 'चायनीज व्हायरस' ने धुमाकूळ घातला आहे. भल्या भल्या बलाढ्य देशांची मिजास उतरवली आहे. त्यातून अमेरिकेसाखी जगातली एकमेव महासत्ताही सुटली नाही. या विषाणूने सर्वाधिक थैमान घातले आहे ते युरोपातील इटली आणि अमेरिकेमध्ये. इटली मध्ये मृतांची संख्या १० हजारांत पोचली आहे तर मध्ये एक दिवस असा येऊन गेला जेव्हा एका दिवसात हजार पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले. अमेरिकेत देखील बाधित लोकांची संख्या काही हजारात आहे. मृतांची संख्या ३ हजारच्या पलीकडे आहे. त्यातही महत्वाची गोष्ट आहे ती अशी की अमेरिकेतील मृतांची आणि बाधितांची सर्वाधिक संख्या न्यूयॉर्क शहर आणि राज्यात आहे. या सर्व घडामोडीत काही घटक खूप महत्वपूर्ण आहे, तो म्हणजे क्षमता असूनही योग्य वेळी खबरदारी न घेणे, गाफीलपणा आणि ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर मांडतात त्याप्रमाणे 'पुरोगामीपणाचा' अतिरेक  हे होय. इटली, स्पेन, इंग्लंड जिथे खुद्द प्रिन्स चार्ल्स, पंतप्रधान बोरीस जॉन्सन, आरोग्यमंत्र्यांना विषाणूची बाधा झाली आहे, अमेरिका या सर्वात इतके घायकुतीला आलेले असताना भारत कुठे आहे? भारत अजूनही ज्याला 'कम्युनिटी स्प्रेड' म्हणतात त्या पातळीला पोचलेला नाही. बाधितांची संख्या १,६०० च्या घरात आहे, मृतांची संख्या ५० च्या आत आहे. पण म्हणून केंद्र सरकार आणि राज्य सरकारे अजिबात गाफील नाहीत. वुहान प्रांतातून प्राथिमक बातम्या येत होत्या तेव्हाच केंद्र सरकारने तिथे असलेल्या भारतीय विद्यार्थी आणि इतरांना तातडीने भारतात आणले. हेच इराण, इटली आणि इतर देशांतील भारतीयांच्या बाबतीत झाले. आंतरराष्ट्रीय विमानतळांवर काटेकोर तपासणी आणि विलगीकरण केंद्रात किंवा घरीच विलगीकरण अशी गरजेनुसार व्यवस्था करण्यात आली. केंद्र सरकार, राज्य सरकारे आणि सशस्त्र दले यांनी काय काय पावले उचलली आणि त्याचे महत्व काय आहे याची यादी मोठी आहे आणि पुनरुक्तीची आता गरज नाही. पंतप्रधान मोदींनी केलेल्या 'जनता कर्फ्यू'च्या आवाहनाला अभूतपूर्व प्रतिसाद भारतीयांनी दिला, त्याच अनुभवाच्या आधारावर वेळीच 'लॉकडाऊन'चा निर्यय झाला. लॉकडाऊनचा निर्णय झाल्यांनतर देशभरात पोलीस कारवाई, होणारी मारहाण या तुरळक घटना सोडल्या तर लॉकडाऊन व्यवस्थित पाळला जातो आहे. या सर्व पार्श्वभूमीवर एक निराळी आणि धक्कादायक घटना बाहेर आली, ती म्हणजे दिल्लीच्या निजामुद्दीन भागात 'तबलिगी जमात' च्या कार्यक्रमात हजाराच्या घरात मुस्लिम लोक जमले होते. त्यात काही शेकड्याच्या घरात परदेशी होते. ते लोक तिथून बाहेर निघाल्यानंतर महाराष्ट्र, केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आसाम, तामिळनाडू आणि अंदमान-निकोबार या राज्यात 'त्या' व्यक्तींच्या संपर्कात आल्यामुळे विषाणूबाधितांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे.

                या सर्व घडामोडींनंतर काही मूलभूत प्रश्न निर्माण होतात. दिल्ली सरकारने सुरुवातीला ५० आणि मग २० पेक्षा जास्त लोक एका जागी जमू नये असा आदेश काढला होता. तरीही १३ मार्च पासून २८-२९ मार्च पर्यंत एवढ्या लोकांचा हा समुदाय त्या ठिकाणी जमला कसा? दिल्लीतील त्या झोनच्या पोलीस उपायुक्तांनी तबलिग जमातच्या आयोजकांना 'विनंती' केली होती की अशा पद्धतीचा कार्यक्रम घेऊ नये. हे धुडकावून एवढे लोक जमले कसे? त्याहीपेक्षा संतापजनक प्रश्न असा की 'कायद्याचे राज्य, संविधानाचे राज्य' असलेल्या भारतात पोलिसांना 'एपिडेमिक डिसीजेस ऍक्ट, १८९७' लागू करण्यात आलेला असताना त्या विशिष्ट धर्माच्या या गटाला 'विनंती' करावी लागते?? इथे वारंवार 'विनंती' असं नमूद होत आहे कारण तसा व्हिडिओ समोर आला आहे. मग प्रश्न पडतो की नक्की कुठल्या कायद्याचं राज्य आहे भारतात? भारताचा कायदा बेगुमानपणे आम्ही पाळणार नाही असे म्हणण्याचा उद्दामपणा त्या विशिष्ट धार्मिक गटात येतो कुठून? या सर्वावर वरताण म्हणजे महाराष्ट्रात अहमदनगर येथे, त्याच जिल्ह्यातील नेवासा येथील मशिदीत, बिहार, उत्तर प्रदेश, तेलंगणातील मशिदीत परदेशी मुस्लिम नागरिक लपवून ठेवलेले आढळले आहेत. निजामुद्दीन मर्कझ एक ठिणगी ठरली असे म्हणावे लागेल कारण त्यानंतर ही मशीद प्रकरणे एकामागोमाग एक बाहेर येत आहेत. या सगळ्याचा कळस म्हणजे निजामुद्दीन मर्कझ रिकामी करण्यासाठी देशाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराला रात्री उशिरा तिथे जावे लागले. आणि देशातले ढोंगी सेक्युलर, काही समाजवादी या धार्मिक गटाला 'डरे हुए मुसलमान' म्हणतात. पोलिसही 'विनंती' करतात असा समाजगट 'डरा हुआ' असतो??

                ही सर्व डोक्याला झिणझिण्या आणणारी प्रकरणे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला या घटनाक्रमावर विविध क्षेत्रातून येणाऱ्या प्रतिक्रिया यांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. पहिल्या प्रथम एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की 'निष्पक्ष माध्यमे' असला काही प्रकार नसतो. त्यात सध्याच्या काळात तर नाहीच नाही. तरीही एक गोष्ट मान्य केली पाहिजे की सध्याच्या या विषाणूजन्य आपत्तीच्या काळात बहुतेक सर्व माध्यमे एका जबाबदारीने वागताना दिसत आहेत. नेहमीप्रमाणे काही अपवाद नक्कीच आहेत. त्यात आवर्जून नाव घ्यावेसे वाटेल 'द वायर' या पोर्टलचे. योगी आदित्यनाथ सरकार आणि अयोध्येतील राम नवमी मेळा या बाबतीत योगी आदित्यनाथांच्या तोंडी नसलेली वाक्ये टाकून निष्कारण वाद पेटवण्याचा 'द वायर' चा प्रयत्न होता. 'द वायर' वर रीतसर अब्रुनुकसानीचा खटला भरण्यात आला आहे. वास्तविक द वायर ची ही जुनी खोड आहे आणि असले खटले काही त्यांना नवीन नाहीत. पण दुसऱ्या बाजूला डावे-पुरोगामी वगैरे म्हणून ज्यांची हेटाळणी केली जाते त्या शेखर गुप्ता यांचे 'द प्रिंट' पोर्टल आहे. जिथे सध्याच्या परिस्थितीवर अभ्यासपूर्ण लेखन येत आहे. (द प्रिंट हे माझ्याही काही विशेष आवडीचे नाही. पण जिथे जे चांगले आहे तिथे चांगले म्हटलेच पाहिजे. उगाच आखडूपणा करणे योग्य नाही.) त्यात निजामुद्दीन प्रकरणावर बिस्मी तस्कीन यांनी 'Dear Muslims, Tablighi Jamaat Committed A Crime Against Humanity. Don't Defend Them' अशा स्पष्ट शीर्षकाचा लेख लिहिला आहे. स्वराज्य मॅगेझीन आणि इतर प्रमुख माध्यमांवर देखील ह्याच पातळीवर मांडणी होत आहे. पण प्रश्न पडेल की  हिंदूंना अक्कल शिकवणारे विद्वान आहेत कोण? त्याचे निःसंदिग्ध उत्तर आहे लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर आहेत. लोकसत्ता दिनांक २ एप्रिलचा मधील त्यांचा अग्रलेख 'इस्लाम खतरेमें' हा श्रेष्ठ विचारवंत नरहर कुरुंदकर यांच्या लिखाणाच्या आधारे हिंदूंना अधिक सेक्युलर होण्याची अपेक्षा बाळगतो. त्याचा प्रतिवाद करताना नरहर कुरुंदकर यांच्याच लेखनाचा आधार इथे घेणार आहे.


                नरहर कुरुंदकर मांडतात "राष्ट्रामध्ये एकाहून अधिक धर्माचे लोक आहेत आणि एकाही धर्माचे लोक निम्म्याहून अधिक नाहीत, अशा स्थितीत त्या राष्ट्राने धर्मनिरपेक्ष असणे समजण्यासारखे आहे. पण एका धर्माचे लोक निम्म्याहून अधिक असताना ते राष्ट्र धर्मनिरपेक्ष झालं तर त्या धर्माच्या लोकांनी संमती दिल्यामुळे ते शक्य झालं असा त्याचा अर्थ होतो. त्याच्याशी अन्य धर्मियांचा संबंध नसतो." हा उतारा घेऊन निर्भीड वगैरे संपादकांनी हिंदूंनीच अधिक सेक्युलर व्हावे असा जवळ जवळ उपदेश उपरोल्लेखित अग्रलेखात केला आहे. पण त्याच संपादक मजकुरांनी याच उताऱ्यातील पुढला भाग सोयीस्कररीत्या टाळला आहे. तो असा, "हिंदूंनी मान्यता दिली म्हणून हे राष्ट्र धर्मनिरपेक्ष आहे हे येथील मुसलमानांना मान्य नाही. त्यामुळे हे राष्ट्र हिंदू बहुसंख्येचं राष्ट्र आहे याचं भान ठेवून आपण वागलं पाहिजे याची जाणीव मुसलमानांमध्ये अजिबात राहिली नाही. हिंदूंची 'सहिष्णुता' कायम राहिली याची काळजी धार्मिक अल्पसंख्याकांनीही घ्यायला नको काय?" कुरुंदकरांनी लिहिलेला हा संपूर्ण उतारा वाचल्यानंतर निजामुद्दीन मर्कझ प्रकरणानंतर पुन्हा एकदा ठळकपणे स्पष्ट होत नाही का?? त्याच कुरुंदकरांच्या अन्वय पुस्तकातील 'धर्म आणि मन' या लेखातील काही नोंदी वाचण्यासारख्या आहेत आणि त्या आजच्या काळाशी सुसंगत आहेत. कुरुंदकर म्हणतात "या ठिकाणी दोन भोळसट प्रश्नांना उत्तरे देणे प्राप्त आहे. ज्या देशात मुस्लिम बहुसंख्य नाहीत तिथे इस्लामी राज्य आणण्याचे धोरण समर्थनीय आहे का? ह्या प्रश्नांची तीन उत्तरे आहेत. १) प्रथम म्हणजे, हा संख्येचा प्रश्न नसून गुणवत्तेचा आहे. इस्लाम हा सर्वश्रेष्ठ व एकमेव धर्म असल्यामुळे इस्लामी धर्मराज्याची गुणवत्ता सर्वश्रेष्ठ आहे. (जमात-ए-इस्लामी)  २) इस्लामी राजवट आल्यानंतर फार दिवस मुसलमान अल्पसंख्य राहातच नाहीत. ३) आम्हाला धर्मप्रचाराचे स्वातंत्र्य पूर्णपणे द्या, म्हणजे आधी आम्ही बहुसंख्य होऊ मग न्यायतः इस्लामिक राज्य येईल. (अंजुमन-ए-तबलीग) दुसरा भोळसट प्रश्न, हे सारे अन्याय्य नाही का? त्याला उत्तर हे की न्याय्य काय आणि अन्याय्य काय यावर ईश्वराचा शब्द प्रमाण मानला पाहिजे. तो पवित्र कुराणात सापडतो. हा भूमिकेतून इतरांच्या पेक्षा वेगळे राहण्याची प्रवृत्ती धार्मिक व सांस्कृतिक अहंता, आक्रमक भूमिका, देशाबाहेर निष्ठा, सुधारणा विरोध, इतरांच्या उदारपणाचा अधिक्षेप, ह्या भूमिकांचा उदय होतो."
              इतक्या निःसंदिग्ध शब्दात कुरुंदकर हे सर्व मांडतात. मग स्वतःला कुरुंदकरांचे भक्त वगैरे म्हणवणारे संपादक मजकूर अशा पद्धतीने स्वतःला गरजेचे तेवढे घेऊन मांडणी अग्रलेखात मांडणी करतात आणि जिथे-ज्याची टीका करायची तिथे गुळमुळीत मांडणी करतात. म्हणून शीर्षकाचा एक भाग 'हिंदूंना अक्कल शिकवणारे विद्वान(?) असा आहे. अशा कोणाही व्यक्तीने हिंदूंना अशा परिस्थितीत, अशा पद्धतीने अक्कल शिकवू नये असे वाटत असेल तर कुरुंदकर म्हणतात तशा 'भोळसट' प्रशांच्या पलीकडे जाऊन मूळ इस्लामचा अधिक सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे. सिद्धहस्त, अभ्यासू लेखक प्रा. शेषराव मोरे मांडतात त्याप्रमाणे हिंदूंनी इस्लामचा सखोल असा अभ्यास केलाच नाही. जो केला तो हिंदूंच्या 'सर्व धर्म सारखे असतात' या भूमिकेतून केला. इस्लामचा इस्लामच्या भूमिकेतूनच अभ्यास करणे गरजेचे आहे असे शेषराव मोरे मांडतात त्याचे महत्व या सर्व घटनाक्रमातून अधोरेखित होते. 

Comments

Popular posts from this blog

अथातो बिंब जिज्ञासा

अथातो ब्रह्म जिज्ञासा, असे म्हणत ऋषीमुनींनी या विश्वाचे रहस्य जाणून घेण्यासाठी गहन चर्चा केल्या. त्याचे रूपांतर वेद-उपनिषद, पुराणे यात झाले. त्यासोबतच एक प्रगल्भ समाज उभा राहिला, त्यांच्या पूजा पद्धती, उपासना पद्धती विकसित होत गेल्या. त्या क्रमाने विकसित होत निसर्ग-नैसर्गिक शक्तींची पूजा, यज्ञाद्वारे आहुती देणे ते प्रतीक निर्माण ते प्रतिमा निर्मिती इथवर पोचल्या. श्रेष्ठ मूर्तिविज्ञान साधक, संशोधक डॉ. गोरक्षनाथ तथा गो. ब. देगलूरकर, मांडतात, "ऋग्वेदात श्री विष्णूच्या संबंधी सहा ऋचा आहेत, त्या एका अर्थी विष्णूच्या 'शाब्दिक प्रतिमाच' आहेत. या शाब्दिक प्रतिमेचे प्रत्यक्ष प्रतिमेत रुपांतर करण्यासाठी पाषाण वापरले गेले. ते मग एका कुंपणाने बंदिस्त केले गेले. त्याला 'नारायण वाटक' म्हणू लागले" मूर्ती घडवणे, त्यांचे उपासना, पूजा यातील वाढते महत्त्व, त्यांचे अर्थ हा विषय गहन आहे तरीही उद्बोधक आहे. हाच देगलूरकर यांचा ध्यास आहे. तो आजवर अनेक पुस्तकांमधून समोर आला आहेच, त्यात 'अथातो बिंब जिज्ञासा' या टागोर फेलोशिप साठी लिहिलेल्या थिसीसची भर पडली आहे. तोच थिसीस मूर्ती,...

स्वातंत्र्यवीर सावरकरांची ईश्वरविषयक विचारप्रणाली

                                                'ईश्वर.' जगात जेवढे काही धर्म, जाती, पंथ, समुदाय इ. आहेत ते सगळे कुठल्यातरी ईश्वर नावाच्या अज्ञात शक्तीवर श्रद्धा ठेवून एकत्र आलेले असतात, स्थापन झालेले असतात. प्रत्येक धर्माच्या, जातीच्या ईश्वराबाद्द्लच्या, धार्मिक मान्यताविषयीच्या संकल्पना वेगळ्या असल्या तरी ते श्रद्धेवरच स्थापन झालेले असतात. कित्येक धर्माच्या संस्थापकांनी, तत्वज्ञांनी ईश्वराबद्दल लिहून ठेवलं आहे. हिंदुस्थानात ७००० वर्षांपासून अस्तित्वात असलेला धर्म-संस्कृती म्हणजे 'हिंदू'.  हिंदू धर्माला कोणताही संस्थापक नाही, धर्मग्रंथ नाही, पण हा धर्म वैदिक आर्यांच्या 'वेद' आणि 'उपनिषदे' यांवर आधारलेला आहे. मुळ 'यज्ञ' संकल्पनेनं ईश्वराचं अस्तित्व मानणाऱ्या हिंदू धर्मात कर्मकांडरुपी  थोतान्डावर  भाष्य केलं. ईश्वराच्या अस्तित्वालाच आव्हान देणारे कित्येक तत्वज्ञ होते पण मूळ वेदांचा सखोल अभ्यास करून हिंदू धर्मातील ईश्वराच्या अस्...

डॉ. आंबेडकरांचे आर्थिक चिंतन आणि वर्तमानातील प्रासंगिकता

एक प्रसिद्ध वचन आहे, "some are born great, some achieve greatness and some are those the greatness is thrust on them.." म्हणजे, काही जन्मतःच महान असतात. तर काही आपल्या कार्यातून, कृतीतून महत्पदाला पोचतात. तर काहींवर महानता लादली, थोपली गेलेली असते. प्रस्तुत विषयाला अनुसरून या वचनातला तिसरा भाग अप्रस्तुत आहे. माणूस जन्मतःच महान असतो का? ती जन्मजात महानता त्या माणसाच्या पुढील आयुष्यातील महत्कार्यामुळे सिद्ध होते. थोर, साक्षेपी विचारवंत कुरुंदकर मांडतात त्याप्रमाणे शिवाजी महाराज हे जन्मतःच महान होते असे आपण म्हणतो कारण महाराजांचे संपूर्ण महत्कार्य आपल्या समोर आहे म्हणून. याच न्यायाने भारतीय सामाजिक, राजकीय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक क्षेत्रात आपल्या कृतीतून, कार्यातून महत्पदाला पोचलेले महामानव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्या महामानवाचे महत्कार्य आपल्या समोर आहे, म्हणून आपण अभिमानाने म्हणून शकतो की ते जन्मताच महान होते.  भारतीय समाजमन माणसांना चौकटीत बसवण्यास उत्सुक असते. एकाच झापडबंद दृष्टीने व्यक्ती आणि कार्याकडे बघण्याचा प्रयत्न करते. पण याच भारताची दुसरी ...